वेग, वेळ आणि अंतर हे वैशिष्टय़े असलेल्या ‘नासा फॅमिली नेव्हिगेशन रॅली’ मध्ये चारचाकी वाहन गटात मुंबईच्या सूरज देशमुख-समीर मालवाडे यांनी तर दुचाकी गटात नाशिकच्या चेतन अमृतकर-सागर शिंदे यांनी बाजी मारली.
नाशिक ऑटोमोटिव्ह स्पोर्टस असोसिएशन (नासा) यांच्या वतीने रविवारी आयोजित या रॅलीस सकाळी नऊ वाजता शहरातील गंगापूर रोडवरील सी. के. रिक्रिएशन येथे प्रा. राजेंद्र देशपांडे आणि अ‍ॅड. मोहन बक्षी यांनी झेंडा दाखवला. दुचाकी गटात २० तर चारचाकी गटात ३१ स्पर्धकांनी सहभाग घेतला. वाहतुकीचे सर्व नियम पाळून स्पर्धकांनी सातपूर, मखमलाबाद, पेठरोड, आरटीओ कार्यालय, दुगाव फाटा, वाघेरे, शेवगेडांग हे १०० किलोमीटरचे अंतर पार केले. माजी मोटोक्रॉस खेळाडू आणि नासाचे संस्थापक विजय देशपांडे यांच्या स्मृतीप्रित्यर्थ उत्कृष्ट रायडर म्हणून सूरज देशमुख यांना विदुला देशपांडे यांच्या हस्ते गौरविण्यात आले. स्पर्धेचा इतर निकाल- दुचाकी गट- भारद्वाज आघारकर-सौरभ सिन्हा (द्वितीय), रेश्मा गांगुर्डे-अश्विनी पाटील (तृतीय) तर, चारचाकी गटात ऋतुराज कोहोक-नितीन नागरे (द्वितीय), जतीन ठक्कर-परितोष कोहोक (तृतीय) यांनी यश मिळविले. शेवगेंडांगचे सरपंच सुरेश पोरजेसह उपस्थित मान्यवरांच्या हस्ते विजेत्यांना गौरविण्यात आले.