यजमान नाशिकसह सांगली, ठाण्याच्या पुरुष आणि महिला संघांनी दमदार विजय मिळवीत येथील विभागीय क्रीडा संकुलात आयोजित वरिष्ठ गट ६९व्या महाराष्ट्र राज्य बास्केटबॉल स्पर्धेत आगेकूच केली आहे. जिल्हा बास्केटबॉल संघटनेच्या वतीने आयोजित या स्पर्धेच्या दुसऱ्या दिवशी बुधवारी साखळी सामन्यात पुरुषांमध्ये सांगली, रायगड, नाशिक, ठाणे, चंद्रपूर, उस्मानाबाद, हिंगोली, पुणे या संघांनी, तर महिलांमध्ये मुंबई, ठाणे, नाशिक, नागपूर, औरंगाबाद, सांगली या संघांनी विजय मिळविला. यजमान नाशिकच्या पुरुषांनी धुळे संघाला ५२-११ असे सहज पराभूत केले. नाशिककडून गजानन पाटीलने १२ आणि आंतरराष्ट्रीय खेळाडू आदित्य अष्टेकरने १८ गुण मिळविले. रायगडने परभणीवर ५२-४७ अशी मात केली. असिफ मन्सुरीने १४, तर आकाशने १८ गुण मिळवीत विजयाला हातभार लावला. नागपूर विरुद्ध पुणे हा सामना चुरशीचा झाला. मध्यंतराला पुणे ३८ विरुद्ध ३४ असे चार गुणांनी आघाडीवर होते. पुण्याच्या अजिंक्य माने आणि सिद्धांत शिंदे या आंतरराष्ट्रीय खेळाडूंनी त्यानंतर सुरेख खेळ करीत सामना जिंकून दिला. अजिंक्यने २७, सिद्धांतने १८ गुण मिळविले. नागपूरकडून यश जीवतोडेने २२ गुण मिळवीत एकाकी लढत दिली. ठाणे विरुद्ध मुंबई पश्चिम यांच्यातील सामनाही उत्कंठावर्धक झाला. मध्यंतराला मुंबई ३१-३० असे एका गुणाने पुढे होते. सामना संपण्यास काही मिनिटे शिल्लक असताना ठाण्याच्या विश्वास नाम्बियारने दोन गुणांची आघाडी मिळवून दिली आणि तीच निर्णायक ठरली. ठाण्याने सामना ६६-६४ असा जिंकला. विश्वासने २२ आणि शुभम यादवने १६ गुण केले. मुंबईकडून समीर कुरेशी आणि अश्रफ कुरेशी यांनी प्रत्येकी १२ गुण मिळविले. महिलांमध्ये यजमान नाशिकने रायगडवर ४५-११ असा दणदणीत विजय मिळविला. त्यात स्वाती मिसरच्या १४ गुणांचा वाटा होता. स्पर्धेत ३६ पुरुष आणि २७ महिलांचे संघ सहभागी झाले आहेत. आजच्या इतर सामन्यांचे निकाल पुरुष : सांगली विजयी विरुद्ध गोंदिया ५७-२९, रायगड वि. वि. परभणी ५२-४७, चंद्रपूर वि. वि. जालना ४२-२१, उस्मानाबाद वि. वि. अहमदनगर ३८-१९, हिंगोली वि. वि. वाशीम ६२-५२ महिला : सांगली वि. वि. भंडारा ३४-२७, ठाणे वि. वि. उत्तर मुंबई ६०-५५ नागपूर वि. वि. धुळे ६१-१८, औरंगाबाद वि. वि. अहमदनगर ४१-१४, सांगली वि. वि. भंडारा ३४-२७, मुंबई पूर्व वि. वि. सोलापूर ५३-१७.