भारताने इंग्लंडविरुद्धची एकदिवसीय मालिका 2-1 अशी जिंकली. पुण्यात झालेल्या या मालिकेच्या शेवटच्या सामन्यात भारताने रोमहर्षक पद्धतीने 7 धावांनी विजय मिळवला. भारताने इंग्लंडला सुरुवातीला मोठे धक्के दिले. त्यामुळे विराटसेना लवकर सामना जिंकणार असे वाटत होते. मात्र, सॅम करनने नाबाद 95 धावांची खेळी करत सामना शेवटच्या षटकापर्यंत खेचला. शेवटच्या षटकात इंग्लंडला 14 धावांची गरज होती. मात्र, इंग्लिश फलंदाजांसमोर भिंत म्हणून उभा राहिला टी. नटराजन. त्याने सर्व अनुभव पणाला लावत अवघ्या 6 धावा खर्च केल्या.

वाचा नटराजनच्या या षटकाचा प्रवास…

49.1

भारताला विकेटची नितांत आवश्यकता होती. नटराजनने पहिलाच चेंडू यॉर्कर टाकला. स्ट्राईकरवर असलेल्या सॅम करनने हा चेंडू लाँग ऑनला खेचला. पहिली धाव घेताना करन घसरला. त्यामुळे हार्दिकने यष्टीरक्षकाकडे केलेल्या थ्रोवर दुसरी धाव घेण्याच्या नादात मार्क वूड बाद झाला. वूडने 14 धावा केल्या. त्याने करनसोबत 60 धावांची भागीदारीही रचली.

49.2

खेळपट्टीवर आलेल्या रीस टॉप्लेला नटराजनने हा चेंडूही ऑफ स्टंपबाहेर यॉर्कर खेळवला. डीप पॉईंटला टॉप्लेेने एक धाव घेतली. त्यामुळे करन पुन्हा स्ट्राईकवर आला.

49.3

नटराजनने टाकलेल्या लेंथ बॉलवर करनने चेंडू लेग साईडला टोलवला. त्याला एक धाव मिळाली असती. मात्र, करनने नकार दिला. आता इंग्लंडला 3 चेंडूत 12 धावांची आवश्यकता होती.

49.4

यावेळी नटराजन चुकला. त्याचा यॉर्कर फसला. पण त्याचा फायदा करन घेऊ शकला नाही. त्याने चेंडू लाँग ऑफच्या दिशेने खेळला. कोहलीने चेंडू अडवला. त्यानंतर करनने धाव घेण्यास नकार दिला.

49.5

नटराजनने टाकलेल्या चेंडूवर करनने चौकार लगावला. एक्स्ट्रा कव्हर बाऊंड्रीवर हा चेंडू जाऊन धडकला. चौकार गेला असला तरी विराटने आनंद व्यक्त केला. कारण, आता भारताचा विजय निश्चित झाला होता.

49.6

करनने हा चेंडू लाँग ऑनवर उभ्या असलेल्या हार्दिक पंड्याकडे खेचला. अशा पद्धतीने नटराजनने फक्त 6 धावा देत भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब केले.