ऑस्ट्रेलियाला त्यांच्याच भूमीत २-१ ने धूळ चारण्याचा पराक्रम भारतीय संघाने केला. ब्रिस्बेनमध्ये झालेला अखेरचा सामना 3 विकेट राखून जिंकल्यानंतर टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाचा फिरकीपटू नॅथन लायनला एक गिफ्ट दिलं होतं. सामना संपल्यानंतर भारतीय संघातील सर्व खेळाडूंनी एका जर्सीवर स्वाक्षरी करुन लायनला १०० कसोटी सामने खेळण्याची कामगिरी केल्याबद्दल भेट दिली होती.

नॅथन लायनने आता या जर्सीचा फोटो आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर केला आहे. या जर्सीवर अजिंक्य रहाणे, चेतेश्वर पुजारा आणि रोहित शर्मासह एकूण16 खेळाडूंची स्वाक्षरी आहे. फोटो शेअर करताना लायनने भारतीय संघासोबतच अजिंक्य रहाणेचं विशेष कौतुक केलंय. मालिका विजयाबद्दल अजिंक्य रहाणे आणि टीम इंडियाचं त्याने अभिनंदन केलं आहे. अजिंक्य रहाणेच्या खिलाडूवृत्तीचं नॅथन लायनने विशेष कौतुक केलं असून रहाणेला टॅग करुन त्याचे आभारही मानलेत. तसेच टीम इंडियाने सर्व खेळाडूंची स्वाक्षरी असलेली जर्सी दिल्याबद्दलही लायनने आभार मानले आहेत.

आणखी वाचा- पुन्हा विराट कर्णधार अन् तू उपकर्णधार!; पत्रकाराच्या प्रश्नावर अजिंक्य रहाणेनं दिलं ‘हे’ उत्तर

अजिंक्य रहाणेला टॅग करुन लायनने, “मालिका जिंकल्याबद्दल अजिंक्य रहाणे आणि टीम इंडियाचं अभिनंदन. तू खिलाडूवृत्ती दाखवत टीम इंडियाच्या खेळाडूंची स्वाक्षरी असलेली जर्सी दिलीस त्यासाठी आभारी आहे” अशा आशयाची पोस्ट केली आहे. या पोस्टमध्ये लायनने ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंसोबतचा फोटोही पोस्ट केला आहे. “घरी पोहोचल्याच्या एका आठवड्यानंतर मला मागे वळून बघण्याचा वेळ मिळाला. ऑस्ट्रेलियासाठी खेळणं आणि हिरवी टोपी घालणं माझं नेहमी स्वप्न होतं. ऑस्ट्रेलिया क्रिकेटच्या काही महान खेळाडूंसोबत खेळण्याची आणि त्यांच्याकडून शिकण्याची मला संधी मिळाली. तसेच अनेकांशी चांगली मैत्रीही झाली, ती जीवनभर टिकेल. जरी आम्ही जिंकलो नसलो तरी १०० वी कसोटी खेळताना ब्रिस्बेनच्या मैदानावर वावरणं वैयक्तिक माझ्यासाठी खूप अभिमानाचा क्षण होता. आता सर्व गोष्टी रिसेट करुन मोठ्या ध्येयाचा पाठलाग करण्याची वेळ आली आहे”, अशा आशयाची पोस्ट लायनने केली आहे.

आणखी वाचा- IND vs AUS: विजयी फटका मारण्याआधी ऋषभ पंत काय म्हणाला होता? सैनीने सांगितला ‘तो’ किस्सा

 

View this post on Instagram

 

A post shared by Nathan Lyon (@nath.lyon421)


भारताविरुद्ध कसोटी मालिकेत लायनने चार सामन्यांमध्ये भारताच्या नऊ फलंदाजांना तंबूचा रस्ता दाखवला होता.