मुख्य प्रशिक्षक जस्टिन लँगर यांचीही नकारघंटा

सिडनी : आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या (आयसीसी) चार दिवसांच्या कसोटी सामन्यांच्या प्रस्तावाला ऑस्ट्रेलियाचा फिरकीपटू नॅथन लायन आणि मुख्य प्रशिक्षक जस्टिन लँगर यांनी नकार दर्शवला आहे. विशेष म्हणजे ‘क्रिकेट ऑस्ट्रेलिया’चे मुख्य कार्यकारी अधिकारी केव्हिन रॉबर्ट्स यांनी चारदिवसीय कसोटी क्रिकेटला पाठिंबा दर्शवला आहे. तसेच या वर्षांच्या अखेरीस अफगाणिस्तानविरुद्धच्या कसोटी मालिकेत या प्रस्तावाची अंमलबजावणी करण्याचा विचारही असल्याचे त्यांनी स्पष्ट केले होते.

‘‘मी चारदिवसीय कसोटी सामन्यांच्या विरोधात आहे. ‘आयसीसी’देखील चारदिवसीय क्रिकेटला मान्यता देईल असे वाटत नाही. काही कसोटी सामने हे पाचव्या दिवसापर्यंत कशा प्रकारे रंगतात हे मी क्रिकेटपटू म्हणून अनुभवले आहे. पाच दिवसांपर्यंत लांबणाऱ्या कसोटी लढतींची मजा काही वेगळीच आहे,’’ असे लायन म्हणाला.

यावेळी लायनने ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत यांच्यात अ‍ॅडलेडला २०१४ मध्ये झालेल्या कसोटी सामन्याचेही उदाहरण दिले. अखेरच्या दिवशी शेवटच्या अर्ध्यातासापर्यंत कसोटी कशी रंगली होती, याकडे त्याने लक्ष वेधले.

ऑस्ट्रेलियाचे प्रशिक्षक जस्टिन लॅँगर यांनीदेखील या प्रस्तावावर नाराजी व्यक्त केली आहे. ‘‘माझी पसंती पारंपरिक प्रकाराला आहे. जो कोणी मला चांगल्याप्रकारे ओळखतो, त्याला निश्चितच हे ठाऊक असेल की मी या प्रस्तावाच्या विरोधात आहे,’’ असे ४९ वर्षीय लॅँगर म्हणाले.