पी.व्ही. सिंधू, सायना नेहवाल, किदाम्बी श्रीकांत मुख्य आकर्षण; ५०० खेळाडूंचा सहभाग आणि ४०० सामन्यांची मेजवानी

नागपूर जिल्हा बॅडिमटन संघटना आणि महाराष्ट्र राज्य बॅडिमटन संघटनेच्या संयुक्त यजमानपदाखाली नागपूरातील मानकापूर विभागीय क्रीडा संकुलात आजपासून ८२ व्या वरिष्ठ गटाच्या राष्ट्रीय बॅडिमटन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. नागपुरात २५ वर्षांनंतर प्रथमच ही स्पर्धा होत आहे. विशेष म्हणजे, राष्ट्रीय स्पर्धेत तब्बल साठ लाख रुपयांचे बक्षीस पहिल्यांदाच ठेवण्यात आले असून ऑलिम्पिक पदक विजेत्या पी.व्ही. सिंधू, सायना नेहवाल, किदाम्बी श्रीकांत स्पर्धेचे मुख्य आकर्षण आहे.

देशभऱ्यातून दिग्गज खेळाडूंचा सहभाग असल्याने स्पर्धेला अधिकच महत्त्व प्राप्त झाले असून स्पर्धेची तयारी पूर्ण झाली असल्याची माहिती महाराष्ट्र बॅडिमनट असोसिएशनचे अध्यक्ष अरुण लखानी यांनी पत्रकार परिषदेत दिली.

दोन ते आठ नोव्हेंबर दरम्यान होणाऱ्या स्पर्धेत एकूण ५०० पेक्षा अधिक खेळाडू सहभागी होणार असून ४०० सामने खेळविण्यात येणार आहेत. २९ राज्यातील खेळाडूंनी आपला सहभाग नोंदवला आहे. स्पर्धेसाठी मानकापूर येथील विभागीय क्रीडा संकुलातील इनडोअर स्टेडियमवर ८ कोर्ट तयार करण्यात आले आहे. पुरुष एकेरी, महिला एकेरी, पुरुष दुहेरी, महिला दुहेरी आणि मिश्र दुहेरी अशा पाच प्रकारात सामने खेळविण्यात येतील. राष्ट्रीय बॅडिमटन स्पर्धेचे यजमानपद नागपूरला मिळाल्याने संघटनेच्या वतीने बॅडिमटन असोसिएशन ऑफ इंडियाचे अध्यक्ष डॉ. हिमांता बिस्वा शर्मा यांचे आभार अरुण लखानी यांनी मानले. देशभऱ्यातील येणारे आणि जागतिक बॅडिमटन महासंघाचे ५० मानांकित खेळाडू नागपुरात खेळणार असून महाराष्ट्रातील नवोदित खेळाडूंना यातून मोठी प्रेरणा मिळेल. शिवाय बॅडिमटनचे ज्येष्ठ खेळाडू प्रदीप गंधे व सी.डी. देवरस यांचा सन्मानही या निमित्ताने करण्यात येणार आहे, असेही लखानी यांनी सांगितले.

उद्या, गुरुवारी सकाळी ८.३० वा ७३ व्या आंतरराज्य विभागीय अजिंक्यपद बॅडिमटन स्पर्धेला प्रारंभ होईल. यावेळी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि क्रीडामंत्री विनोद तावडेंसह महापौर नंदा जिचकार उपस्थित राहतील. शुक्रवारी ८२ व्या वरिष्ठ गटाच्या राष्ट्रीय बॅडिमटन स्पर्धेचे उद्घाटन सायंकाळी ६.३० वा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते करण्यात येईल.

यावेळी केंद्रीय क्रीडामंत्री हर्षवर्धन राठोड, पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे व महापौर नंदा जिचकार प्रामुख्याने उपस्थित राहतील. सोबतच मान्यवरांच्या हस्ते ७३ व्या आंतरराज्य विभागीय स्पर्धेचे बक्षीस वितरणही करण्यात येईल. बुधवारी ८ नोव्हेंबरला सायंकाळी ५.३० वाजता राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते वरिष्ठ गटाच्या राष्ट्रीय बॅडिमटन स्पर्धेचे बक्षीस वितरण करण्यात येईल.

यावेळी राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार, पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे उपस्थित राहतील. पत्रकार परिषदेला बॅडिमटन असोसिएशन ऑफ इंडियाचे सचिव पुनिया चौधरी, उपाध्यक्ष मुरलीधरन, प्रदीप गंधे, सदस्य गिरीश नातू, महाराष्ट्र बॅडिमटन संघटनेचे सचिव सुंदर शेट्टी, नागपूर डिस्ट्रीक्ट बॅडिमटन असोसिएशनच्या अध्यक्षा कुंदा विजयकर, सचिव मंगेश काशीकर प्रामुख्याने उपस्थित होते.

उपउपांत्यपूर्व फेरीत थेट प्रवेशप्राप्त खेळाडू

पुरुष एकेरी :  किदाम्बी श्रीकांत, प्रणोय कुमार, साई प्रणीत, समीर वर्मा, अजय जयराम, सौरभ वर्मा, पारुपल्ली कश्यप, डॅनियल फरीद. महिला एकेरी : पी.व्ही. सिंधू, सायना नेहवाल, रितूपर्णा दास, अनुरा प्रभूदेसाई.

उपांत्यपूर्व फेरीत थेट प्रवेशप्राप्त खेळाडू 

पुरुष दुहेरी : सात्विकसराज रंकीरेड्डी-चिराग शेट्टी, मनू अत्री-रेड्डी सुमित, अर्जुन एम.आर.-रामचंद्रन श्लोक, ‘बाइ’च्या रँकिंगमधील अव्वल खेळाडू. महिला दुहेरी : अश्विनी पोन्नाप्पा-रेड्डी सिक्की, संजना संतोष-आरती सारा सुनील, जक्कंपुडी मेघना-एस.राम पूर्वीशा, ‘बाइ’च्या रँकिंगमधील अव्वल खेळाडू.

मिश्र दुहेरी : प्रणव चोप्रा-रेड्डी सिक्की, रेड्डी सुमित-अश्विनी पोन्नाप्पा, ‘बाइ’च्या रँकिंगमधील अव्वल खेळाडू, दुसऱ्या स्थानावरील खेळाडू.

बक्षिसाचे स्वरूप

महिला व पुरुष एकेरी – उपउपांत्य फेरी ५० हजार, उपांत्यपूर्व ७५ हजार, उपांत्यफेरी एक लाख, उपविजेता दीड लाख, विजेता दोन लाख. महिला पुरुष दुहेरी- उपांत्यपूर्व ७५ हजार,उपांत्य फेरी एक लाख, उपविजेता दीड लाख, विजेता २ लाख. सांघिक- उपांत्यफेरी ७५ हजार, उपविजेता ३ लाख, चॅम्पियन्स पाच लाख.