मुकुंद धस, लुधियाना

राजस्थानच्या मुलांनी महाराष्ट्राचा ९२-७४ असा पराभव करून येथील गुरुनानक क्रीडा संकुलात सुरू असलेल्या ६९व्या राष्ट्रीय ज्युनियर बास्केटबॉल स्पर्धेत सलग दुसऱ्या विजयाची नोंद केली. सुरुवातीपासून आक्रमक धोरण स्वीकारलेल्या विजेत्यांच्या झंझावातापुढे महाराष्ट्राचा बचाव पूर्ण कोलमडला होता. विजेत्यांनी सुरुवातीचे ११ गुण नोंदवल्यानंतर सहाव्या मिनिटात महाराष्ट्राने फ्री थ्रोद्वारे आपले खाते उघडले. पहिल्या सत्रामधील ५-१८ अशा पिछाडीनंतर महाराष्ट्राकडून कडव्या लढतीची अपेक्षा होती. परंतु राजीव आणि सुमित या दुकलीने आक्रमणाची धार वाढवून मध्यांतराला विजेत्यांना ४९-२९ अशी निर्णायक आघाडी मिळवून दिली.

उत्तरार्धात महाराष्ट्राच्या तनय थत्तेला सूर गवसला. ५७-८०च्या  पिछाडीनंतर तनयच्या अचूक नेमबाजीमुळे महाराष्ट्राने सलग १५ गुण नोंदवून सामन्यात रंगत निर्माण केली. खेळ संपण्यास तीन मिनिटे बाकी असताना विजेत्यांकडे ८०-७२ अशी आघाडी होती. या मोक्याच्या क्षणी महाराष्ट्राचा बचाव पुन्हा ढेपाळला आणि राजीव, आशीष आणि सुमितने वेगवान चाली रचून राजस्थानला विजय मिळवून दिला. अत्यंत सदोष नेमबाजी हे महाराष्ट्राच्या पराभवाचे प्रमुख कारण होते. याचप्रमाणे विजेत्यांनी ४० गुण केवळ ‘फास्ट ब्रेक’वर नोंदवले, हे महाराष्ट्राच्या ढिसाळ बचावाचे उत्तम उदाहरण होते.

संक्षिप्त निकाल

मुले – महाराष्ट्र : ७४ ( तनय थत्ते २९, फैजान काझी १७, डॅनिश कुरेशी ९, निखिल माँटेरो ७, नागेश सुतार ६, समशेर मन्सुरी ५, सैरभ मानकर १) पराभूत राजस्थान : ९२ (राजीव कुमार २९, सुमित कुमार १७, आशीष त्रिवेदी १२, दीपक चौधरी १०) ५-१८, २४-३१, २६-२२, १९-२१.

महाराष्ट्रच्या १५ खेळाडूंवर बंदी

प्राथमिक वैद्यकीय चाचणीत महाराष्ट्राच्या फैझल खानसह १५ खेळाडू दोषी आढळून आले असून त्यांचा क्ष-किरण अहवाल येईपर्यंत खेळण्यास बंदी घालण्यात आली आहे. यामुळे राजस्थानविरुद्धच्या सामन्यात फैझल खेळू शकला नाही.

 ९ खेळाडूंना खेळण्यास मज्जाव

अमेरिकन एनबीएने नोएडा येथे स्थापन केलेल्या बास्केटबॉल अकादमीत देशातील होतकरू खेळाडूंना प्रशिक्षण देण्यात येते. या अकादमीतील ९ खेळाडूंना त्यांच्या राज्यातर्फे खेळण्यास मंगळवारी अचानक महासंघाने मज्जाव केला.

यामध्ये महाराष्ट्राच्या सूरजकुमार पाठकसहित पंजाब आणि उत्तराखंडच्या प्रत्येकी दोन तर छत्तीसगड,  केरळ,  तामिळनाडू आणि उत्तर प्रदेशच्या प्रत्येकी एका खेळाडूचा समावेश आहे. या तुघलकी निर्णयाचा बहुतांश राज्यांनी निषेध केला असून निर्णय मागे घेण्याबाबत महासंघावर दबाव वाढवण्यात येत आहे.

प्रशिक्षकांच्या निधनामुळे छत्तीसगडचे दोन्ही संघ माघारी

प्रशिक्षक राजेश पटेल यांच्या आकस्मिक निधनामुळे छत्तीसगडच्या मुला/मुलींच्या संघांनी स्पर्धेतून माघार घेतली असून, ते पटेल यांच्या अंत्यदर्शनासाठी भिलाईला रवाना झाले. छत्तीसगड मुलींच्या माघारीमुळे ‘अ’ गटातील उर्वरित संघ तामिळनाडू, कर्नाटक, मध्य प्रदेश व गुजरात पुढील वर्षी वरिष्ठ पातळीवर खेळण्यास पात्र ठरले.