मुकुंद धस, लुधियाना

वैष्णवी यादवने एकहाती नोंदवलेल्या विक्रमी ५९ गुणांच्या जोरावर गतउपविजेत्या उत्तर प्रदेशच्या मुलींनी ६९व्या ज्युनियर राष्ट्रीय बास्केटबॉल स्पर्धेत महाराष्ट्राला ९१-८३ असे पराभूत केले. महाराष्ट्राच्या मुलींनी कडवी झुंज देताना उत्तर प्रदेशला अखेपर्यंत संघर्ष करण्यास भाग पाडले.

वैष्णवी आणि हर्षिता यांच्यावर अवलंबून असलेल्या विजेत्यांनी पहिल्या सत्रातील २२-२६ अशी पिछाडी भरून काढत विजय नोंदवला. महाराष्ट्राचा संघ अनुभवी आणि तुलनेत समतोल होता, परंतु बचावात तो खूपच कमी पडला. सुरुवातीला साक्षी आणि सुझनने सुरेख समन्वय राखत महाराष्ट्राला १४-९ आणि २६-२२ अशी आघाडी मिळवून दिली. त्यानंतर वैष्णवी आणि हर्षिताने सूत्रे हातात घेताना खेळाची गती वाढवली.

चेंडूवर नियंत्रण ठेवताना दोन्ही हातांचा समान वापर करून प्रतिस्पध्र्याच्या संरक्षित क्षेत्रात प्रवेश करत वारंवार बास्केट करण्याचे वैष्णवीचे कसब उल्लेखनीय होते. चेंडू हातात आल्यावर प्रतिस्पध्र्याच्या किमान तीन खेळाडूंना हुलकावण्या देऊन तिने डाव्या हाताने केलेले बास्केट उपस्थितांची वाहवा मिळवून गेले. तिला हर्षिताने सुरेख साथ देत विजेत्यांना मध्यंतराला ४७-३९ अशी आघाडी मिळवून दिली.

उत्तरार्धात पिछाडी भरून काढण्यासाठी महाराष्ट्राकडून बचावतंत्रात बदल अपेक्षित होता. शिवाय थकलेल्यांना विश्रांती देऊन ताज्या दमाच्या खेळाडूंना खेळवणे आवश्यक होते. यंदा भारतीय युवा संघाच्या पहिल्या १५ मध्ये निवड झालेल्या नागपूरच्या सिया देवधरला या सामन्यात अजिबात संधी मिळू नये, हे आश्चर्यकारक होते. उंच सुझनने आपल्या शरीरयष्टीचा योग्य वापर करून संघातर्फे सर्वाधिक १९ गुण नोंदवले. केवळ बास्केट करणे महत्त्वाचे नसून प्रतिस्पध्र्याचे बास्केट रोखणे हे जास्त महत्त्वाचे आहे, हा धडा या सामन्यातून महाराष्ट्राने घेतला तर त्याचा फायदा त्यांना पुढील सामन्यात होईल.

महाराष्ट्र : ८३ (सुझन पिंटो १९, साक्षी कोटियन १७, अंशिका कनोजिया १४, नेहा साहू १४, श्रेया दांडेकर ११) पराभूत वि. उत्तर प्रदेश : ९१ (वैष्णवी यादव ५९, हर्षिता पांडे २०) : २६-२२, १३-२५, १८-२३, २६-२१.

अन्य निकाल

मुली : ओडिशा वि. वि. आंध्र प्रदेश ५७-४१; मुले : केरळ वि. वि. मध्य प्रदेश १०३-८६, तामिळनाडू वि. वि. चंदिगड ९१-६९, राजस्थान वि. वि. दिल्ली ८९-८८.

राजेश पटेल यांचे निधन

छत्तीसगढ बास्केटबॉल संघटनेचे सरचिटणीस, भारतीय महिला/मुली संघाचे माजी प्रशिक्षक राजेश पटेल यांचे हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले. पटेल यांनी छत्तीसगढ मुलींना मिनी, युवा, कनिष्ठ आणि महिला गटात अनेक राष्ट्रीय अजिंक्यपदे पटकावून दिली होती. १५ वर्ष संघाला सर्वोच्च स्थानी ठेवले. लुधियाना येथील स्पध्रेसाठी येत असताना प्रवासादरम्यान त्यांना हृदयविकाराचा झटका आला. सोमवारी कनिष्ठ राष्ट्रीय स्पर्धेच्या उद्घाटनापूर्वी त्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली.