प्रताप शिंदे यांच्याकडे प्रशिक्षकपदाची जबाबदारी

रोहा (रायगड) येथे २८ ते ३१ जानेवारी या कालावधीत होणाऱ्या ६६व्या वरिष्ठ राष्ट्रीय अजिंक्यपद कबड्डी स्पर्धेसाठी महाराष्ट्राच्या प्राथमिक संघाची घोषणा करताना राज्य अजिंक्यपद स्पर्धा गाजवणाऱ्या सुलतान डांगेला डावलण्यात आले आहे. या संघाच्या प्रशिक्षकपदाची धुरा मुंबई उपनगरातील प्रताप शिंदे यांच्याकडे सोपवण्यात आली आहे.

राज्य अजिंक्यपद स्पर्धेत रायगडला विजेतेपद मिळवून देण्यात सुलतानच्या अष्टपैलू कामगिरीचा मोलाचा वाटा होता. मात्र तरीही राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवडण्यात आलेल्या ३० खेळाडूंच्या प्राथमिक चमूत स्थान मिळवण्यात त्याला अपयश आले आहे. डांगेने मागील दोन हंगामांमध्ये नंदुरबारचे प्रतिनिधित्व केले होते. मात्र गेल्या हंगामात त्याला नंदुरबारने राखीव खेळाडू म्हणूनच संघाबाहेर ठेवले होते. त्याआधी सुलतान त्याचा मूळ जिल्ह्य म्हणजे पुण्याकडून खेळला होता. गेल्या वर्षी राष्ट्रीय विजेतेपद पटकावणाऱ्या महाराष्ट्राच्या संघातील पकडपटू विराज लांडगेला या संघात स्थान मिळवता आले नाही. राज्य अजिंक्यपद स्पर्धा खेळू न शकलेल्या विराजने प्रो कबड्डी लीगमध्ये दबंग दिल्लीचे प्रतिनिधित्व करताना ७ सामन्यांत फक्त ६ गुण मिळवले होते.

प्रो कबड्डीमध्ये यू मुंबाचे प्रतिनिधित्व करताना २१ सामन्यांत २१८ गुण मिळवून चढाईपटूंमध्ये तिसरे स्थान मिळवणाऱ्या सिद्धार्थ देसाईने महाराष्ट्राच्या प्राथमिक संघात स्थान मिळवले आहे. महाराष्ट्राच्या संघात राज्य निवड चाचणीमधील २० खेळाडू आणि प्रो कबड्डी लीगमधील १० खेळाडूंचा समावेश आहे. अलिबाग येथे १३ जानेवारीपासून महाराष्ट्राचे सराव शिबीर सुरू होणार आहे. यातून राष्ट्रीय स्पर्धेसाठी महाराष्ट्राच्या अंतिम १२ खेळाडूंची निवड करण्यात येणार आहे.

महाराष्ट्राचा प्राथमिक संघ (३० खेळाडू) : सुशांत साहिल, पंकज मोहिते, विशाल माने (मुंबई), रिशांक देवडिगा, आशीष मोहिते (उपनगर), गिरीश इर्नाक, नीलेश साळुंके (ठाणे), अमीर धुमाळ, संकेत बनकर (रायगड), अभिषेक भोजने, अजिंक्य पवार, प्रदीप शिंदे (रत्नागिरी), नितीन मदने, राहुल वडार, सचिन शिंगाडे (सांगली), अक्षय निकम, ऋतुराज कोरवी, तुषार पाटील (कोल्हापूर), विकास काळे, सिद्धार्थ देसाई, सुनील दुबळे (पुणे), प्रणव अहिरे (नाशिक), विजेंद्र सपकाळे (जळगाव), कृष्णा गायके (जालना), संदीप राठोड (परभणी), धनंजय आसने (अहमदनगर), सूरज देसाई (नंदुरबार), मरतड फुंडे (बीड), दिवाकर पाटील (धुळे), अरविंद देशमुख (पालघर).प्रशिक्षक : प्रताप शिंदे.

किशोर-किशोरी संघनिवडीसाठी नवे सूत्र

पाटणा (बिहार) येथे २१ ते २४ जानेवारी यादरम्यान होणाऱ्या किशोर-किशोरी राष्ट्रीय अजिंक्यपद कबड्डी स्पर्धेसाठी महाराष्ट्राच्या संघाची निवड करण्याकरिता सर्व जिल्ह्यांना प्रत्येकी चार खेळाडूंची नावे पाठवण्याचे आवाहन करण्यात आले आहे. किशोर-किशोरी राज्य अजिंक्यपद स्पर्धेसाठी राज्य कबड्डी संघटनेने बऱ्याच जिल्ह्यांशी संपर्क साधला; परंतु उपलब्ध वेळेत आयोजन करणे शक्य नसल्यामुळे सर्वानी अनुत्सुकता दर्शवली. परिणामी संघनिवडीसाठी ही पद्धत राबवण्यात येणार असल्याचे राज्य कबड्डी संघटनेने सर्व जिल्हा संघटनांना पत्र पाठवून कळवले आहे. अंतिम १२ खेळाडूंचे सराव शिबीर शिवाजी पार्क, दादर येथे होणार आहे.

सुलतान डांगेची बाद फेरीमधील कामगिरी

  • चढायांचे एकूण गुण : २१
  • उपांत्यपूर्व फेरी : १०
  • उपांत्य फेरी : ५
  • अंतिम फेरी : ६
  • पकडीचे एकूण गुण : ३