अव्वल धावपटू ललिता बाबर, सुधा सिंग, जैशा सहभागी होणार
आंतरराष्ट्रीय धावपटू ललिता बाबर, सुधासिंग, ओ.पी.जैशा यांच्यासह अनेक अव्वल दर्जाचे खेळाडू राष्ट्रीय क्रॉसकंट्री स्पर्धेत सहभागी होत आहेत. भारतीय अ‍ॅथलेटिक्स महासंघाने आयोजित केलेली ही स्पर्धा येत्या शनिवार व रविवारी पुण्यात होणार आहे.
शिवछत्रपती क्रीडानगरीत होणाऱ्या या स्पर्धेतील विजेत्या संघांना महापौर चषक दिले जाणार आहेत. महापौर दत्तात्रय धनकवडे यांनी याबाबत माहिती देताना सांगितले, शनिवारी दुपारी ३ ते ६ या वेळेत १६ वर्षांखालील मुले व मुली (२ किलोमीटर), १८ वर्षांखालील मुले (६ किलोमीटर) व मुली (४ किलोमीटर) या गटाच्या शर्यती होणार आहेत. रविवारी सकाळी ६ ते १० या वेळेत २० वर्षांखालील मुले (८ किलोमीटर), मुली (६ किलोमीटर), पुरुष (१२ किलोमीटर) व महिला (८ किलोमीटर) या गटाच्या शर्यतींचे आयोजन केले जाणार आहे.
स्पर्धेत रेल्वे, सेनादल, महाराष्ट्र, केरळ, हरयाणा, दिल्ली, पंजाब, बंगाल, तामिळनाडू, आंध्र प्रदेश, अखिल भारतीय पोलीस मंडळ आदी संघांमध्ये सांघिक विजेतेपदासाठी चुरस राहणार आहे. स्पर्धेत २९ संघांचे एक हजार खेळाडू व अधिकारी सहभागी होत आहेत. त्यामध्ये मोनिका राऊत, स्वाती गाडवे, जयश्री बोरगी, संजीवनी जाधव, मोनिका आठरे, रोहिणी राऊत, रतीराम सैनी, योगेंद्रकुमार, सचिन पाटील, सोमपाल, गोविंदसिंग, अनिल पवार, बेलीअप्पा, रमेश बिश्नोई, कैलास हिरवे, प्रदीपसिंग चौधरी, जगमाल, गोवाराम, अजयकुमार आदी अव्वल दर्जाच्या खेळाडूंचा समावेश आहे. आगामी आशियाई क्रॉसकंट्री स्पर्धेसाठी भारताच्या पुरुष व महिला तसेच २० वर्षांखालील मुले व मुली संघांची निवड या स्पर्धेतून केली जाणार असल्यामुळे त्यास विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.
स्पर्धेसाठी आंतरराष्ट्रीय पंच बाप्टिस्ट डीसूझा यांच्या मार्गदर्शनाखाली ट्रॅक तयार करण्यात आला आहे. त्यामध्ये कॅमलजंप, अवघड वळणे, टेबल टॉप, भुसभुशीत माती, पाणी असे अडथळे राहणार आहेत. स्पर्धेसाठी महाराष्ट्राच्या खेळाडूंचे सराव शिबिर शिवछत्रपती क्रीडानगरीतच सुरू आहे. या शिबिरास मेजर जगन्नाथ लकडे, सुहास व्हनमाने, दत्तात्रय जायभाय व हर्षदा जोशी-दुबे यांचे मार्गदर्शन लाभले आहे.