जगभरात करोना व्हायरसविरूद्ध लढाईसाठी डॉक्टरांच्या आणि वैद्यकीय सेवा पुरवणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या प्रयत्नांचे कौतुक केले जात आहे. जागतिक संकटामुळे भारतासह जगातील वेगवेगळी रुग्णालये करोनारूग्णांनी पूर्णपणे भरली आहेत. त्यांच्या सेवांचे कौतुक करत भारताचा कर्णधार विराट कोहली, उपकर्णधार रोहित शर्मा, माजी फलंदाज व्हीव्हीएस लक्ष्मण आदी क्रिकेटपटूंनी राष्ट्रीय डॉक्टर दिन (National Doctor’s Day) च्या निमित्ताने सोशल मीडियावर खास संदेश पोस्ट करत डॉक्टरांच्या प्रयत्नांचे स्वागत केले.

कर्णधार विराट कोहलीने सर्व वैद्यकीय कर्मचाऱ्यांना सलाम केला. “फक्त आजच नाही, तर दररोज आपण आपल्या डॉक्टरांचा आणि आरोग्य सेवेतील कर्मचाऱ्यांचा दिवस साजरा केला पाहिजे. लोकांना मदत करण्याच्या प्रतिबद्धतेबद्दल सर्व डॉक्टरांचे आभार. मी तुमच्या समर्पणभावनेला सलाम करतो. #National Doctor’s Day”, अशी भावना विराटने व्यक्त केली.

करोना व्हायरसविरुद्ध लढाईत आवश्यक असलेल्या मार्गदर्शक सूचनांविषयी सोशल मीडियावर नियमितपणे आपलं मत मांडणार्‍या रोहितने चाहत्यांना या महामारीच्या काळात डॉक्टरांनी दाखवलेल्या धैर्याची आठवण करून दिली. “या कठीण काळात आपल्या डॉक्टरांनी केलेला त्याग आणि धैर्य साऱ्यांना माहिती आहे. त्यांनी आमच्यासाठी केलेले प्रयत्न शब्दात वर्णन करणे शक्य नाही. मी त्यांना शुभेच्छा देऊ इच्छितो. सर्व नागरिकांना त्यांच्या प्रोटोकॉलचे पालन करावे आणि त्यांचे कार्य सुलभ करावे. #National Doctor’s Day”, अशी पोस्ट रोहितने ट्विटरवर शेअर केली.

भारताचा माजी फलंदाज व्हीव्हीएस लक्ष्मण याने खास व्हिडीओ पोस्ट करत डॉक्टरांना सलाम केला. आपल्या प्राणांची पर्वा न करता सध्याच्या कसोटीच्या काळात कार्यरत असणाऱ्या ‘सुपरहिरों’ना त्याने सलाम केला. त्याचसोबत #National Doctor’s Day हा हॅशटॅगही वापरला.

याशिवाय, हार्दिक पांड्या, मुंबई इंडियन्स यांनीही आपल्या ट्विटरवरून डॉक्टरांच्या कार्याला सलाम केला.

दरम्यान, करोनाच्या या महामारीमध्ये अविरत झटणाऱ्या डॉक्टर्स आणि वैद्यकीय सेवेतील कर्मचाऱ्यांना सर्व स्तरातून #National Doctor’s Day च्या शुभेच्छा देण्यात येत आहेत.