जागतिक उत्तेजक प्रतिबंधक संस्थेने (वाडा) भारतामधील उत्तेजकविरोधी चळवळीला धक्का देताना राष्ट्रीय उत्तेजक चाचणी प्रयोगशाळेला (एनडीटीएल) सहा महिन्यांसाठी निलंबित केले आहे. भारतामधील राष्ट्रीय उत्तेजक चाचणी प्रयोगशाळेला २००८मध्ये ‘वाडा’ची मान्यता मिळाली होती. परंतु २० ऑगस्टपासून त्यांचा उत्तेजक चाचणी घेण्याचा अधिकार काढून घेण्यात आला आहे. टोक्यो ऑलिम्पिकसाठी एक वर्षांहून कमी कालावधी शिल्लक असताना हा भारताला मोठा धक्का बसला आहे.

राष्ट्रीय उत्तेजक प्रतिबंधक संस्था (नाडा) रक्त किंवा लघवीचे नमुने घेऊ शकते. परंतु त्यांच्या चाचणीसाठी त्यांना आता ‘वाडा’ची मान्यता असलेल्या देशाबाहेरील प्रयोगशाळांवर अवलंबून राहावे लागणार आहे.

‘‘आंतरराष्ट्रीय प्रयोगशाळांच्या निकषांची पूर्तता राष्ट्रीय उत्तेजक चाचणी प्रयोगशाळेकडून होत नसल्यामुळे ही कारवाई करण्यात आली आहे. नमुन्याच्या पृथक्करणाची पद्धतीसुद्धा योग्य पद्धतीने येथे होत नव्हती,’’ असे ‘वाडा’कडून स्पष्ट करण्यात आले आहे. आता राष्ट्रीय उत्तेजक चाचणी प्रयोगशाळेला पुढील २१ दिवसांत या कारवाईविरोधात लुसाने येथील क्रीडा लवादाकडे दाद मागता येईल.

‘‘राष्ट्रीय उत्तेजक चाचणी प्रयोगशाळा ही ‘नाडा’पासून स्वतंत्र आहे. चाचण्या आमची संस्था करीत नाही. आम्ही फक्त नमुने जमवण्याचे कार्य करतो,’’ असे ‘नाडा’चे संचालक नवीन अगरवाल यांनी सांगितले.

ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धा ११ महिन्यांवर आले असताना देशातील क्रीडा चळवळीला हा मोठा धक्का बसला आहे. राष्ट्रीय क्रीडा महासंघांची हा अतिरिक्त खर्च उचलण्याची क्षमता नाही, असे ‘आयओए’चे अध्यक्ष नरिंदर बात्रा यांनी सांगितले.

उत्तेजक चाचणीचे नमुने बाहेरील देशांत पाठवण्याइतपत भारतामधील क्रीडा संघटनांची स्थिती योग्य नाही. बँकॉक, थायलंड येथील ‘वाडा’ची मान्यता असलेल्या प्रयोगशाळेचा पर्याय उपलब्ध आहे. परंतु उत्तेजक चाचण्यांवरील खर्च वाढवणार, तशी संख्येत घट होईल. त्यामुळे देशातील उत्तेजकविरोधी मोहिमेवर गंभीर परिणाम होईल.     – नरिंदर बात्रा, भारतीय ऑलिम्पिक संघटनेचे अध्यक्ष

राष्ट्रीय उत्तेजक चाचणी प्रयोगशाळेवर बंदी घालण्याच्या ‘वाडा’च्या निर्णयाविरोधात आम्ही क्रीडा लवादाकडे दाद मागणार आहोत. ही प्रक्रिया सुरू झाली आहे.    – किरण रिजिजू, केंद्रीय क्रीडामंत्री

व्यावसायिक हितासाठी ‘वाडा’चा निर्णय -क्रीडा मंत्रालय

राष्ट्रीय उत्तेजक चाचणी प्रयोगशाळेवर सहा महिन्यांसाठी बंदी घालण्याच्या ‘वाडा’च्या निर्णयाबाबत केंद्रीय क्रीडा मंत्रालयाने आश्चर्य प्रकट केले. व्यावसायिक हितासाठी ‘वाडा’ने हा निर्णय घेतल्याचा आरोप क्रीडा मंत्रालयाने घेतला आहे. ‘‘सप्टेंबर २०१८मध्ये ‘वाडा’च्या चमूने काही मुद्दय़ांबाबत आक्षेप घेतले होते. त्याची पूर्तता आम्ही केली. परंतु ही कारवाई आश्चर्यकारक आहे,’’ अशी प्रतिक्रिया क्रीडा सचिव राधे श्याम जुलानिया यांनी व्यक्त केली.

उत्तेजक चाचण्यांची जबाबदारी ‘नाडा’ची – ‘बीसीसीआय’

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) काही दिवसांपूर्वीच गेली १० वष्रे चालू असलेला संघर्ष संपवून ‘नाडा’च्या आधिपत्याखाली येण्याचा निर्णय घेतला होता. परंतु आता केंद्रीय क्रीडा मंत्रालय अडचणीत सापडले आहे. ‘‘नमुन्यांची उत्तेजक चाचणी ‘नाडा’ने कुठून करावी, हा विचार करण्याची जबाबदारी आमची नाही,’’ असे ‘बीसीसीआय’च्या पदाधिकाऱ्याने सांगितले.

  • पुढील वर्षी होणाऱ्या टोक्यो ऑलिम्पिकच्या पाश्र्वभूमीवर ‘नाडा’ ५००० खेळाडूंच्या चाचण्या घेण्याची शक्यता होती. २०१८-१९ या वर्षांत ‘नाडा’कडून ४३४८ चाचण्या घेण्यात आल्या. यापैकी ४६६ रक्ताच्या चाचण्या होत्या. राष्ट्रीय क्रीडा महासंघ किंवा क्रीडा मंत्रालयाने हा अतिरिक्त भार स्वीकारला नाही, तर चाचण्यांची संख्या कमी होईल.