महाराष्ट्राच्या हृतिका श्रीरामने एक मीटर स्प्रिंगबोर्ड डायव्हिंगमध्ये सुवर्णपदक जिंकून राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत सोनेरी हॅट्ट्रिक पूर्ण केली. जलतरणात तिचीच सहकारी आकांक्षा व्होराने ४०० मीटर फ्रीस्टाईल शर्यत जिंकून पाचवे सुवर्णपदक पटकाविले.
हृतिकाने एक मीटर स्प्रिंगबोर्डमध्ये १८७.३५ गुण नोंदवले. तिने याआधी तीन मीटर स्प्रिंगबोर्ड व १० मीटर प्लॅटफॉर्म डायव्हिंगमध्ये सुवर्णपदक जिंकले होते. तिचीच सहकारी सिमरन रजनीने १८७.१५ गुण नोंदवत रुपेरी कामगिरी केली. k10
आकांक्षाने ४०० मीटर फ्रीस्टाईल शर्यत चार मिनिटे ३२.५० सेकंदात पार केली. तिने या आधी या स्पर्धेत चार सुवर्णपदके व एक रौप्यपदक जिंकले आहे. महाराष्ट्राच्या जोत्स्ना पानसरेला मात्र ५० मीटर बॅकस्ट्रोक शर्यतीत रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. तिने हे अंतर ३१.३६ सेकंदात पूर्ण केले. तिने या पदकासह आतापर्यंत दोन सुवर्ण व तीन रौप्यपदके जिंकली आहेत. गुजरातची शालेय खेळाडू मन्ना पटेलने ही शर्यत ३०.६८ सेकंदात पार करीत सोनेरी यश मिळवले.
पुरुषांच्या ४०० मीटर फ्रीस्टाईल शर्यतीत महाराष्ट्राच्या सौरभ संगवेकर याला रौप्यपदक मिळाले. त्याने हे अंतर ३ मिनिटे ५९.७ सेकंदात पार केले. केरळच्या साजन प्रकाशने त्याला मागे टाकत ही शर्यत ३ मिनिटे ५७.१६ सेकंदात जिंकली. अन्य शर्यतींमध्ये महाराष्ट्राच्या खेळाडूंना अपेक्षित कामगिरी करता आली नाही.
टेनिसमध्ये कीर्तने व बेंद्रे उपांत्य फेरीत
टेनिसमधील पुरुषांच्या दुहेरीत नितीन कीर्तने व अन्वित बेंद्रे यांनी उपांत्य फेरी गाठली. त्यांनी योगेश फोगाट व विजयंत मलिक  यांचा ४-६, ६-१, १०-१ असा पराभव केला. प्रार्थना ठोंबरेने एकेरी व दुहेरीत आगेकूच राखली. तिने एकेरीत प्रीति उज्जयिनीला ६-१, ६-२ असे लीलया हरविले. दुहेरीत तिने रश्मी तेलतुंबडेच्या साथीने अशिमा गर्ग व व्हिक्टोरिया चहाल यांच्यावर ६-२, ६-२ अशी मात केली.

वॉटरपोलोत संमिश्र यश
वॉटरपोलोत पुरुषामध्ये महाराष्ट्राला उपांत्य फेरीत सेनादलाविरुद्ध ६-१८ असा दारुण पराभव स्वीकारावा लागला. सेनादलाकडून शॉन दास याने सहा गोल करीत सिंहाचा वाटा उचलला. महाराष्ट्राकडून अर्जुन कावळे याने चार गोल केले, तर सुमीत गव्हाणे व प्रतीक अजमिरे यांनी प्रत्येकी एक गोल केला. महिलांमध्ये महाराष्ट्राने कर्नाटकला ६-३ असे हरविले, त्याचे श्रेय सायली गुढेकर हिने केलेल्या तीन गोलांना द्यावे लागेल. मानसी गावडे, कोमल किरवे व स्वप्नाली सूर्यवंशी यांनी प्रत्येकी एक गोल केला.

नेमबाजीत स्वप्निलला रौप्य
महाराष्ट्राच्या स्वप्निल कुसळेचे ५० मीटर रायफल थ्री पोझिशनमधील सुवर्णपदक हुकले. सेनादलाच्या सत्येंद्र सिंगला सुवर्णपदक मिळाले. या दोन्ही खेळाडूंनी प्रत्येकी ४४५.८ गुण नोंदविले. मात्र टायब्रेकरद्वारा सत्येंद्रला सुवर्ण, तर स्वप्निल याला रौप्यपदक देण्यात आले.