पुरुष रिले शर्यतीत रौप्य, तर ११० मीटर अडथळा शर्यतीत पारस पाटीलला कांस्य

लखनौ : महाराष्ट्राचा स्टीपलचेसपटू अविनाश साबळे आणि लांब उडीपटू मुरली श्रीशंकर यांनी शुक्रवारी राष्ट्रीय आंतरराज्य अ‍ॅथलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धेत सुवर्णपदकांची कमाई करीत जागतिक अजिंक्यपद स्पर्धेच्या पाश्र्वभूमीवर इशारा दिला आहे. याशिवाय पुरुषांच्या ४ बाय १०० मीटर रिले शर्यतीत महाराष्ट्राने रौप्यपदक जिंकले, तर ११० मीटर अडथळा शर्यतीत पारस पाटीलने कांस्यपदक मिळवले.

पुरुषांच्या ४ बाय ४०० मीटर रिलेच्या अंतिम फेरीत मोहम्मद अनासने त्याच्या चमूतील खेळाडूऐवजी अन्य चमूतील खेळाडूची बॅटन घेऊन पुढे धावल्यामुळे गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली. अनासचा सहकारी अ‍ॅलेक्स अँथनीने दुखापतीमुळे माघार घेतली.

२४ वर्षीय साबळे हा आंतरराष्ट्रीय अ‍ॅथलेटिक्स महासंघाच्या जागतिक क्रमवारीत २५व्या स्थानावर आहे. त्याने ८:३३.१९ मिनिटे अशी विक्रमी वेळ नोंदवत सुवर्णपदकावर नाव कोरले. परंतु त्याला त्याचा ८:२८.९४ मिनिटांचा राष्ट्रीय विक्रम मात्र मोडता आला नाही. ही स्पर्धा सर्वात शेवटी खेळवण्यात आली. जागतिक अजिंक्यपद स्पर्धेसाठी तीन हजार मीटर स्टीपलचेसमध्ये ८:२९ मिनिटे अशी पात्रता वेळ निश्चित करण्यात आली आहे आणि साबळे या स्पर्धेसाठी आधीच पात्र ठरला आहे.

ओदिशाची धावपटू द्युती चंदला महिलांच्या १०० मीटर शर्यतीत जागतिक अजिंक्यपद स्पर्धेची पात्रता गाठण्यात अपयश आले. तिने ११.३८ सेकंदांची वेळ नोंदवत शर्यत जिंकली. परंतु ०.१४ सेकंदांनी (११.२४ सेकंद) तिची संधी हुकली.