रोहा : गतविजेत्या महाराष्ट्राने अपेक्षेप्रमाणेच विदर्भाचा ६४-१३ असा धुव्वा उडवला आणि राष्ट्रीय कबड्डी स्पध्रेत विजयी सलामीसह अ-गटातून झोकात बाद फेरी गाठण्याची किमया साधली.

म्हाडा मैदानातील दत्ताजीराव ग. तटकरे क्रीडानगरीत २० हजार कबड्डीरसिकांच्या साक्षीने महाराष्ट्राने दुबळ्या विदर्भावर एकंदर सहा लोण चढवले. सामन्याच्या पाचव्या मिनिटाला लोण देत मध्यंतराला मिळवलेले ४०-३ हे नियंत्रण महाराष्ट्राने अखेपर्यंत सुटू दिले नाही. महाराष्ट्राच्या खात्यावर २७ जमा झाल्यावर विदर्भाला आपले खाते उघडता आले. उपकर्णधार तुषार पाटील आणि अभिषेक भोजने यांनी दिमाखदार चढाया केल्या, तर कर्णधार गिरीश इर्नाक आणि आमिर धुमाळ यांच्या लक्षवेधी पकडींनी रायगडवासीयांची मने जिंकली. महाराष्ट्राने या सामन्यात आपल्या दोन चढाईपटूंशिवाय बाकी सर्व खेळाडूंना अजमावले. फक्त अ-गटात तीन संघांचा समावेश असल्यामुळे महाराष्ट्राने एका विजयासह बाद फेरीमधील स्थान निश्चित केले आहे.

महाराष्ट्राच्या विजयाबाबत प्रशिक्षक प्रताप शिंदे म्हणाले, ‘‘नागोठण्यामधील सराव सत्रानंतर प्रत्यक्ष स्पध्रेआधी दोन दिवसांची विश्रांती खेळाडूंना मिळाली होती. त्यामुळे गुणांपेक्षा आक्रमणाची रणनीती आणि बचावावर विशेष भर देण्यात आला. दोन चढाईपटूंना आम्ही राखून ठेवले आहे. योग्य वेळी त्यांचा खेळ पाहायला मिळेल. यापुढे गुजरातचे आव्हान असेल. या संघात भारतीय क्रीडा प्राधिकरणाच्या खेळाडूंचा अधिक भरणा असल्यामुळे त्यांना कमी लेखण्याची चूक आम्ही करणार नाही.’’

दोन अतिरिक्त संघांमुळे संयोजकांची तारांबळ!

राष्ट्रीय कबड्डी स्पध्रेसाठी भारतीय हौशी कबड्डी महासंघाची मान्यता असलेल्या ३१ संघांची हजेरी अपेक्षित होती. परंतु स्पध्रेच्या पहिल्या दिवशी संयोजकांकडे तब्बल ३३ संघांनी उपस्थितीची नोंद दिल्यामुळे तारांबळ उडाली. मात्र संघटनेवर कार्यरत असलेले प्रशासक निवृत्त न्यायमूर्ती एस. पी. गर्ग यांच्या सल्ल्यानुसार ही दोन्ही संघटनात्मक प्रकरणे मार्गी लावण्यात आली. भारतीय हौशी कबड्डी महासंघ बरखास्त झाल्यानंतर प्रशासकांच्या यजमानपदाखाली ही पुरुषांची राष्ट्रीय स्पर्धा होत आहे. जानेवारीमध्ये महिलांची स्पर्धा होऊ शकली नव्हती. मात्र महाराष्ट्र राज्य कबड्डी संघटनेने हे शिवधनुष्य पेलले. परंतु पहिल्याच दिवशी केरळचे दोन संघ आल्यामुळे संयोजक अडचणीत सापडले. केरळ कबड्डी संघटनेमध्ये अध्यक्ष सुधीर कुमार आणि सचिव विजय कुमार यांच्यात वाद निर्माण झाल्यामुळे संघटनात्मक फूट पडली आहे. हे प्रकरण न्यायालयात चालू असून, मंगळवारी सुनावणीची तारीख असल्यामुळे नेमक्या कोणत्या संघाला अधिकृत ठरवावे हा प्रश्न होता. मात्र तांत्रिक समितीने प्रशासकांशी चर्चा करून दोन्ही संघांमधील प्रत्येकी सहा खेळाडूंसह एकंदर १२ खेळाडूंचा केरळ संघ खेळवण्याचे निर्देश दिले.

आंध्र प्रदेश कबड्डी संघटनेमधील वादाबाबत न्यायालयाने आधीच निर्णय दिला आहे. मात्र तरीही दोन संघ रोह्य़ाच्या स्पध्रेला आल्याबद्दल सर्वानाच आश्चर्य वाटले. यापैकी अध्यक्ष के. ई. प्रभाकर आणि सचिव वीर लंकय्या यांच्या नेतृत्वाखालील संघटनेच्या बाजूने न्यायालयाने कौल दिला असल्यामुळे त्यांच्या संघाने स्पध्रेसाठी थांबावे, अन्य संघाने माघारी परतावे, असे निर्देश तांत्रिक समितीने दिले.

महाराष्ट्राच्या किशोर खेळाडूंचा सन्मान

नुकत्याच पाटणा येथे झालेल्या किशोर राष्ट्रीय स्पध्रेत विजेतेपद मिळवणाऱ्या महाराष्ट्राच्या खेळाडूंचा उद्घाटन कार्यक्रमात विशेष सत्कार करण्यात आला. यावेळी राज्य कबड्डी संघटनेकडून खेळाडूंसह प्रशिक्षक दिगंबर जाधव आणि व्यवस्थापक बजरंग परदेशी यांना प्रत्येकी १५ हजार रुपयांचे इनाम देऊन सन्मानित करण्यात आले.

प्रेक्षक गॅलरी अपुरी

कबड्डीवर निस्सीम प्रेम करणाऱ्या रोहेकरांनी दिलेल्या भरघोस प्रतिसादामुळे प्रेक्षक गॅलरी अपुरी पडली. त्यामुळे संयोजकांना प्रेक्षक गॅलरीच्या पुढील मोकळ्या जागेत अतिरिक्त खुच्र्याची व्यवस्था करावी लागली.

दिरंगाईची परंपरा

महाराष्ट्रातील कोणत्याही कबड्डी स्पध्रेच्या उद्घाटनाला दिरंगाईची परंपरा आहे. राष्ट्रीय स्पध्रेसारख्या महत्त्वाच्या स्पध्रेतही ही परंपरा कायम असल्याचे दिसून आले. स्पध्रेचे उद्घाटन दुपारी ४ वाजता होणार होते, तर सामन्यांना ५ वाजता सुरुवात होणार होती. मात्र भव्यदिव्य उद्घाटन सोहळ्याला उशीर झाल्यामुळे अखेरीस ७.३० वाजता पहिल्या सामन्याला प्रारंभ झाला. उद्घाटन कार्यक्रमात आमदार जयंत पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते सुनील तटकरे, स्पध्रेच्या निरीक्षक सुनील डब्बास यांनी व्यासपीठावर चौफेर फटकेबाजी केली.