सोनाली हेळवीच्या लक्षवेधी चढाया

महाराष्ट्राच्या महिलांनी खडतर गटाचे दडपण झुगारत सलामीच्या सामन्यात गतविजेत्या भारतीय रेल्वेला झुंजवले. परंतु अखेरीस रेल्वेने ३३-३२ अशी एका गुणाने बाजी मारत ६७व्या वरिष्ठ राष्ट्रीय अजिंक्यपद कबड्डी स्पध्रेत विजयी सलामी नोंदवली. महाराष्ट्राच्या पुरुष संघाने जम्मू आणि काश्मीर संघाला ४७-२४ असे नमवून विजयी सलामी दिली.

पूर्णिमा विद्यापीठाच्या बंदिस्त क्रीडा संकुलात चालू असलेल्या या कबड्डी स्पध्रेत पहिल्याच दिवशी महिलांच्या अ-गटात रोमहर्षक सामन्याचा आनंद कबड्डीरसिकांना घेता आला. या सामन्यात महाराष्ट्रातील दोन सोनालींचा खेळ वैशिष्टय़पूर्ण ठरला. महाराष्ट्र संघाच्या सोनाली हेळवीने पराभव टाळण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले, परंतु ती पराभव टाळण्यात अपयशी ठरली, तर सोनाली शिंगटे रेल्वेच्या विजयाची शिल्पकार ठरली. महाराष्ट्राची कर्णधार अंकिता जगतापनेही दिमाखदार चढाया केल्या. रेल्वेकडून मीनल जाधवने अप्रतिम खेळ केला. गतवर्षी साखळीतच गारद झाल्यामुळे यंदा अवघड गटात समाविष्ट झालेल्या महाराष्ट्राच्या महिलांनी या विजयासह अन्य संघांना इशारा दिला आहे.

पुरुषांच्या क-गटात महाराष्ट्राने आक्रमक सुरुवात करीत पूर्वार्धातच दोन लोण देत २६-१० अशी भक्कम आघाडी घेतली. उत्तरार्धात सावध खेळ करीत सामना आरामात आपल्या नावे केला. शुभम शिंदे, रोहित बने यांचा भक्कम बचाव, तर पंकज मोहिते, अजिंक्य पवार यांच्या पल्लेदार चढाया या विजयात महत्त्वपूर्ण ठरल्या. पुरुषांच्या ड-गटात बिगरनामांकन तमिळनाडूने चौथा नामांकन असलेल्या हरियाणाला ३७-३१ असे पराभूत करीत खळबळ उडवून दिली.