गतवर्षीचे दु:स्वप्न मागे टाकून उमेदीने नवी भरारी घेण्यासाठी सज्ज झालेल्या महाराष्ट्राच्या महिला संघासाठी ६७व्या वरिष्ठ राष्ट्रीय अजिंक्यपद कबड्डी स्पर्धेतील साखळीचा टप्पा पार करणे आव्हानात्मक ठरणार आहे.

सोमवारपासून जयपूरला प्रारंभ होणाऱ्या या स्पर्धेत महाराष्ट्राचा खडतर अ-गटात समावेश करण्यात आला असून, या गटात गतविजेते भारतीय रेल्वे आणि बलाढय़ तमिळनाडूचा समावेश आहे.

गेल्या वर्षी रणनीती चुकल्यामुळे महाराष्ट्राच्या महिला संघाला साखळीतच गारद होण्याची नामुष्की ओढवली होती. पण यंदा सिमरन गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली आणि अंकिता जगतापच्या नेतृत्वाखालील महाराष्ट्राच्या संघाला साखळीचा अडथळा ओलांडण्याचे प्रमुख लक्ष्य असेल. गटात तीन संघ असल्यामुळे पहिले दोन संघ बाद फेरी गाठू शकतील. या दृष्टीने महाराष्ट्र-तमिळनाडू सामना दोन्ही संघाचे उपांत्यपूर्व फेरीचे भवितव्य निश्चित करू शकेल.

महिलांच्या संघाप्रमाणेच पुरुष संघाची मदारसुद्धा नवोदित खेळाडूवर असेल. या विभागात क-गटात महाराष्ट्रासह हिमाचल प्रदेश, मणिपूर आणि जम्मू आणि काश्मीर यांचा समावेश आहे. त्यामुळे गेल्या वर्षी रोहा येथे झालेल्या राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेत उपांत्य फेरीपर्यंत मजल मारणाऱ्या महाराष्ट्राला साखळीचा मार्ग सोपा मानला जात आहे. स्वप्निल शिंदेच्या नेतृत्वाखाली आणि आशीष म्हात्रेच्या मार्गदर्शनाखाली हा संघ दोन वर्षांपूर्वी मिळवलेल्या विजेतेपदाची पुनरावृत्ती करण्यासाठी प्रयत्नशील असेल. पवन शेरावतच्या नेतृत्वाखालील रेल्वेचा अ-गटात समावेश असून, या गटात गुजरात आणि झारखंड हे अन्य दोन संघ आहेत.