|| मुकुंद धस

मुलांमध्ये पंजाबला विजेतेपद; महाराष्ट्राच्या मुलींना कांस्यपदक

यजमान राजस्थानच्या मुलांनी महाराष्ट्राचा ८५-५४ असा एकतर्फी धुव्वा उडवून उदयपूरला झालेल्या ३५ व्या युवा (१६ वर्षांखालील ) राष्ट्रीय बास्केटबॉल स्पर्धेचे अजिंक्यपद पटकावले. महाराष्ट्राच्या मुलांना रौप्य पदकावर समाधान मानावे लागले तर मुलींनी छत्तीसगडचा ७४-४८ असा पराभव करून कांस्य पदक पटकावले.

मुलांच्या अंतिम सामन्यावर यजमानांनी पूर्ण वर्चस्व गाजवले. जितेंदर आणि रिषभ यांनी त्यांच्या उंचीचा पुरेपूर वापर करून महाराष्ट्राचा बचाव मोडून काढला. तर राजवीरने अचूक नेमबाजीच्या जोरावर सामना एकतर्फी केला. केवळ यशराज राजेमहाडिकने महाराष्ट्रातर्फे चमक दाखविली. उपांत्य फेरीप्रमाणे या सामन्यातदेखील ओजस आंबेडकरला सुरुवातीला मैदानात उतरविण्यात आले नाही. त्यामुळे सातत्याने चांगली कामगिरी करणाऱ्या ओजसला सूर गवसला नाही. त्यातच  प्रीतिश आणि रझा निष्प्रभ झाल्याने महाराष्ट्राचे आक्रमण थिटे पडले आणि त्याचा फायदा राजस्थानला झाला. शेवटच्या सत्रात तर महाराष्ट्राला केवळ ८ गुण नोंदवता आले यावरून विजेत्यांच्या भक्कम बचावाची कल्पना येऊ  शकते. प्रेक्षकांचा प्रचंड पाठिंबा लाभल्याने राजस्थानला चांगलाच हुरूप आला होता. त्यामुळे त्यांनी खेळाचा वेग वाढवून भराभर गुण नोंदवून विजय साजरा केला.

मुलींमध्ये पंजाबला विजेतेपद

मुलींच्या अंतिम सामन्यात कर्नाटकच्या मुलींनी पंजाबच्या उंच हरसिमरन आणि काव्याची चांगली कोंडी केल्याने सामना चुरशीचा झाला. परंतु सुखमनने मोक्याच्या क्षणी गुण नोंदवून पंजाबला २४ वर्षांनंतर अजिंक्यपद मिळवून देण्यास मदत केली. तत्पूर्वी, सकाळच्या सत्रात, महाराष्ट्राच्या मुलींनी छत्तीसगडचा ७४-४८ असा पराभव करून दोन वर्षांनंतर कांस्यपदक पटकावले. स्पर्धेत सुमारे २३ गुणांच्या सरासरीने ७ सामन्यांत एकूण १५९ गुण नोंदविणाऱ्या सुझननला रोखण्याचे सर्व प्रयत्न अपयशी ठरल्याने छत्तीसगडने शेवटच्या सत्रात हात टेकले. महाराष्ट्राने मोठा विजय नोंदविला. सुझन (३४ गुण) आणि वैभवी तावडे (१६ गुण) यांनी विजेत्यांतर्फे चमक दाखवली.

अंतिम सामने

  • मुले : महाराष्ट्र ५४ (यशराज राजेमहाडिक १८) पराभूत वि. राजस्थान ८५ (राजवीर २६, जितेंदर १८, रुद्रप्रताप १७)१४-१८, १२-२०, २०-२८, ८-१९
  • मुली : पंजाब ६७ (सुखमन १६, काव्या ११) विजयी वि. कर्नाटक ६६ (संजना कुमार २४, माया कृष्णा ११) १३-१५, १७-१४, १९-१४, १८-२३