मध्य प्रदेशातील दिव्यांग खेळाडू मनमोहन सिंग लोधी याने राज्य सरकारवर एक घणाघाती आरोप केला आहे. राज्य सरकारने दिलेले वचन पाळले नाही, त्यामुळे आता माझ्यावर भीक मागण्याची वेळ आली असल्याचे त्याने प्रतिक्रिया देताना म्हटले आहे. मनमोहन सिंग लोधी याने राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धांमध्ये पदके मिळवली आहेत. पण राज्य सरकारने दिलेला शब्द न पाळल्यामुळे सध्या त्याच्यावर भोपाळच्या रस्त्यांवर भीक मागण्याची वेळ आली आहे.

राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धा जिंकल्यावर मध्य प्रदेश सरकारने त्याला सरकारी नोकरी देण्याचे वचन दिले होते. पण आता मात्र राज्य सरकारकडून त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. मी राज्याच्या मुख्यमंत्र्यांना चार वेळा भेटलो. त्यांनीही मला सरकारी नोकरी देण्याचा शब्द दिला. पण तो शब्द अद्याप पाळला गेलेला नाही. माझ्या खेळासाठी मला पैशांची गरज आहे. आणि माझे कुटुंब पोसण्यासाठीही मला पैशांची आवश्यकता आहे. जर मुख्यमंत्री आपला शब्द पाळत नसतील, तर मला रस्त्यावर भीक मागून माझे घर चालवावे लागेल, असे तो म्हणाला.

मनमोहन सिंग लोधी हा मूळ नरसिंगपूरचा आहे. २००९ साली एका अपघातात त्याला आपला एक हात गमवावा लागला. पण त्यामुळे तो खचला नाही. त्याने आपले धावपटू म्हणून कारकीर्द सुरूच ठेवली आणि काही राष्ट्रीय आणि राज्यस्तरीय स्पर्धांमध्ये यश मिळवले. २०१७ मध्ये अहमदाबादमध्ये झालेल्या १००-२०० मीटर धावण्याच्या स्पर्धेत त्याने रौप्यपदक पटकवले होते. त्यानंतर मध्य प्रदेश सरकारने त्याला मध्य प्रदेशचा सर्वोकृष्ट दिव्यांग क्रीडापटू जाहीर केले होते. पण २०१७मध्ये निघालेल्या सरकारी नोकरीच्या जागांमध्ये मात्र त्याला नोकरी मिळू शकली नाही.