मेर्लिन जोसेफ हिने रांची येथील राष्ट्रीय खुल्या मैदानी स्पर्धेतील शंभर मीटर शर्यतीत नोंदविलेल्या राष्ट्रीय विक्रमाबाबत साशंकता व्यक्त करण्यात येत आहे. पूर्वीचा विक्रम नोंदविणाऱ्या रचिता मिस्त्री हिनेच हा आक्षेप घेतला आहे.  मेर्लिन हिने उपांत्य फेरीत ११.३५ सेकंद अशी कामगिरी करीत रचिता हिचा तेरा वर्षांपूर्वीचा ११.३८ सेकंद हा विक्रम मोडला. या विक्रमाबाबत आक्षेप घेत रचिता म्हणाली, मेर्लिन हिने या शर्यतीच्या पहिल्या फेरीत १२.०७ सेकंद अशी वेळ नोंदविली तर अंतिम फेरीत तिने ११.९५ सेकंद वेळ नोंदविली. त्यामुळेच उपांत्य फेरीत तिने दिलेली ११.३५ सेकंद ही वेळ शंकास्पद आहे. ही वेळ घेताना काही चूक झाली असावी. उपांत्य फेरीपेक्षा अंतिम फेरीत तिने अधिक चांगली कामगिरी करणे अपेक्षित आहे. मेर्लिन हिने नोंदविलेला विक्रमाबाबत भारतीय अ‍ॅथलेटिक्स महासंघाकडून खात्री करण्यात आलेली नाही.