भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी याने नुकतीच एका एकदिवसीय सामन्यात कर्णधारपदाची धुरा सांभाळली. आशिया चषक स्पर्धेत केवळ औपचारिकता म्हणून खेळवण्यात आलेल्या भारत विरुद्ध अफगाणिस्तान या सामन्यात त्याने संघाचे नेतृत्व केले. पण धोनीला अशा पद्धतीने कर्णधार करणे आणि संघात घाऊक बदल करणे हे संघ निवड समितीला अजिबात रुचले नसल्याचे सांगण्यात येत आहे.
आशिया चषक स्पर्धेसाठी नियमित कर्णधार विराट कोहली याला विश्रांती देण्यात आली होती. त्यामुळे रोहित शर्माकडे कर्णधारपद देण्यात आले होते. मात्र अफगाणिस्तानविरुद्धचा सामना हा स्पर्धेच्या निकालाच्या दृष्टीने महत्वाचा नसल्याने या सामन्यात भारताच्या संघाने काही खेळाडूंना विश्रांती देण्याचा निर्णय घेतला आणि त्यानुसार संघात बदल केले. पण इंडिया टुडेच्या वृत्तानुसार हे बदल निवड समितीला पटलेले नसल्याचे सूत्रांकडून सांगण्यात येत आहे.
या सामन्यात सलामीवीर रोहित शर्मा आणि शिखर धवन दोघेही संघाबाहेर होते. विशेष म्हणजे तब्बल ६९६ दिवसानंतर संघाचे कर्णधारपद धोनीकडे सोपवण्यात आले होते. त्यामुळे इतक्या मोठ्या कालावधीनंतर अचानक संघाचे नेतृत्व एखाद्याला देणे, ही बाब निवड समितीला अजिबातच पसंत पडली नाही, असे सांगण्यात येत आहे.
दरम्यान, तो सामना धोनीसाठी कर्णधार म्हणून २००वा सामना होता. हा सामना जिंकून धोनीला विजयाची भेट देणे ही भारतीय खेळाडूंची इच्छा होती. पण हा सामना अफगाणिस्तानच्या झुंजार गोलंदाजीमुळे बरोबरीत सुटला होता.
First Published on October 9, 2018 5:22 pm