क्रीडामंत्री किरेन रिजिजू प्रयत्नशील

नवी दिल्ली : टोक्यो ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेतील खेळाडूंकरिता मे महिन्याच्या अखेपर्यंत सराव शिबिरे सुरू करण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे केंद्रीय क्रीडामंत्री किरेन रिजिजू यांनी सांगितले. मात्र अन्य खेळाडूंना सराव शिबिरांसाठी किमान सप्टेंबपर्यंत थांबावे लागेल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

देशातील टाळेबंदी १७ मेपर्यंत वाढवण्यात आल्याने भारतीय क्रीडा प्राधिकरणाची (साइ) देशभरातील केंद्रे बंद आहेत. या स्थितीत तेथे राष्ट्रीय सराव शिबिरे आयोजित करता येणार नाहीत. ‘‘सर्व सराव शिबिरे ही टप्प्याटप्प्याने सुरू करण्यात येतील. सध्या एनआयएस पतियाळा आणि साइ बेंगळूरु या केंद्रांमध्ये ऑलिम्पिकसाठी पात्र ठरलेले खेळाडू वास्तव्यास आहेत. या महिन्याच्याअखेरीस पतियाळा आणि बेंगळूरु या केंद्रांमध्ये सराव शिबिरांना सुरुवात करण्याचा प्रयत्न आहे. ही सराव शिबिरे टोक्यो ऑलिम्पिकसाठी पात्र ठरलेल्या किंवा पात्रता स्पर्धाची तयारी करणाऱ्या खेळाडूंसाठीच आहेत. ऑलिम्पिकची तयारी महत्त्वाची असल्याने या शिबिरांना परवानगी देण्याचा प्रयत्न आहे,’’ असे रिजिजू यांनी स्पष्ट केले.

करोना विषाणू संसर्गामुळे देशभरातील राष्ट्रीय सराव शिबिरे ही मार्च महिन्याच्या मध्यापासून स्थगित करण्यात आली आहेत. ‘‘३ मे पासून साइ केंद्रांवर खेळाडूंच्या सराव शिबिराला सुरुवात करण्याचा प्रयत्न होता. मात्र अत्यावश्यक सेवांमध्ये कुठेही क्रीडाक्षेत्र येत नाही. या स्थितीत हळूहळू क्रीडाक्षेत्राशी संबंधित सर्व सुरू करावे लागणार आहे. ऑलिम्पिकशी संबंधित जे खेळाडू नाहीत त्यांची सराव शिबिरे मात्र सप्टेंबर-ऑक्टोबपर्यंत सुरू करणार नाही,’’ असे क्रीडामंत्र्यांनी स्पष्ट केले. जोपर्यंत करोना संसर्ग आटोक्यात येत नाही तोपर्यंत कोणत्याही क्रीडा प्रकारातील स्पर्धा होणार नाहीत, असेही रिजिजू यांनी सांगितले.

व्यायामशाळांना आर्थिक मदतीची सरकारकडे मागणी

मुंबई : सध्या करोनामुळे व्यायामशाळा बंद आहेत. महाराष्ट्रात २० हजार व्यायामशाळा असून त्यात मिळून जवळपास एक लाख कर्मचारी वर्ग आहे. मात्र हे सर्व सध्या बंद असल्यामुळे कर्मचारी, प्रशिक्षक, शरीरसौष्ठव खेळाडू यांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न उद्भवला आहे. यास्थितीत या व्यायामशाळांना आर्थिक सहकार्य करावे, तसेच ते सुरू करण्यासाठी परवानगी द्यावी, अशी विनंती भारतीय शरीरसौष्ठव महासंघाचे सरचिटणीस संजय मोरे यांनी राज्य सरकारकडे पत्राद्वारे केली आहे.