आर्थिक परिस्थितीवर मात करून बॉक्सिंगचे प्रशिक्षण

घरच्या आर्थिक परिस्थितीवर मात करत सातपाटी येथील मोहित नरेंद्र किणी या १४ वर्षीय तरुणाने त्याने केलेल्या बचतीच्या पैशातून किक बॉक्सिंगचे प्रशिक्षण घेतले व राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धामध्ये सहभागी होऊन त्यांनी विजेतेपद मिळविले आहे.

मोहितचे आजोबा श्रावण किणी हे मूळचे (गुजरात) मरोळी येथील मच्छीमार असून कामानिमित्त ते सातपाटी येथे आले आणि तेथेच स्थायिक झाले. मोहितचे वडील नरेंद्र आणि आई नीलम किणी हे दोघे कर्णबधिर आहेत.  सध्या मालाड येथे एका कंपनीत नोकरी करत आहेत.

घरची एकंदर परिस्थिती पाहता किक बॉक्सिंग खेळासाठी त्याच्या घरच्यांनी प्रथम विरोध दर्शवला होता. त्याची या खेळातील आवड व जिद्द पाहत त्यांच्या नातेवाईकांनी प्रशिक्षण घेण्यासाठी मोहितला पैशाची मदत केली. जून २०१८ मध्ये हिमाचल प्रदेश येथे झालेल्या राष्ट्रीय स्तरावरील किक बॉक्सिंग स्पर्धेमध्ये पालघर जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करत मोहितने पुन्हा रौप्य पदक पटकाविले. आत्तापर्यंत मोहित किणी हा चार जिल्हा, पाच राज्ये व एका राष्ट्रीय स्तरावरील किक बॉक्सिंग स्पर्धामध्ये निवडला गेला आहे व सहा सुवर्ण, पाच रौप्य व दोन कांस्य पदकांचा मानकरी ठरला आहे.

याबद्दल अलीकडेच मरोळी येथे गुजरातचे कृषिमंत्री रमणभाई पाटकर यांच्या हस्ते त्याचा सत्कार करण्यात आला. यापुढेही मोहित किक बॉक्सिंगचे प्रशिक्षण सुरू ठेवणार असून ऑलम्पिक स्पर्धेत सुवर्ण पदक मिळविण्याचे त्याचे स्वप्न आहे. सातपाटी येथील एका सामान्य कुटुंबातल्या मुलाने मिळविलेल्या या यशाबद्दल मोहितचे सर्वत्र कौतुक केले जात आहे.

दूरचित्रवाणीवरील स्पर्धा पाहून आवड

मोहित हा शालेय शिक्षण घेत असून दूरचित्रवाणीवरील बॉक्सिंगच्या स्पर्धा बघून त्याला किक बॉक्सिंगची आवड निर्माण झाली. घरची आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने सुरुवातीला त्याने काका- मामांकडून मिळणाऱ्या खाऊसाठीच्या पैशांची बचत करून घरच्यांच्या नकळत पालघर येथे किक बॉक्सिंगचे प्रशिक्षण घेतले. तेथूनच त्याने मुंबई येथे राज्यस्तरावरील किक बॉक्सिंगच्या स्पर्धेत भाग घेऊन पहिल्यांदा रौप्य पदक पटकाविले.