पुनरागमनासाठी उत्सुक असलेल्या बी साईप्रणीतचे मत

गुवाहाटी : पुढील महिन्यात सुरू होणाऱ्या ऑल इंग्लंड अजिंक्यपद बॅडमिंटन स्पर्धेच्या तयारीसाठी राष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेचा मोठय़ा प्रमाणावर फायदा होणार आहे, अशी प्रतिक्रिया भारतीय बॅडमिंटनपटू बी. साईप्रणीतने मंगळवारी व्यक्त केली.

अव्वल खेळाडू किदम्बी श्रीकांत व एच एस प्रणॉय यांनी तंदुरुस्तीच्या कारणास्तव स्पर्धेतून माघार घेतल्यामुळे पुरुष एकेरीत साईप्रणीतलाच विजेतेपदासाठी प्रबळ दावेदार मानले जात आहे. गतवर्षी साईप्रणीतलासुद्धा दुखापतीमुळे अनेक महत्त्वाच्या स्पर्धाना मुकावे लागले होते.

‘‘मागील हंगामात सततच्या स्पर्धामुळे मी माझ्या तंदुरुस्तीकडे लक्ष देऊ शकलो नाही. त्यामुळे माझा आत्मविश्वासही खालावला. जून ते डिसेंबरदरम्यान मी एकाही स्पर्धेतून माघार किंवा विश्रांती घेतली नाही. मात्र आता मी राष्ट्रीय स्पर्धेसाठी पूर्णपणे तयार असून मला कोणत्याही प्रकारची दुखापतदेखील नाही,’’ असे साईप्रणीत म्हणाला.

‘‘ऑल इंग्लंड प्रत्येक बॅडमिंटनपटूसाठी महत्त्वाचे आहे. त्यासाठी १०० टक्के सराव व्हावा, म्हणून राष्ट्रीय स्पर्धेत मी जोमाने खेळणार आहे. भारतातील सर्व अव्वल खेळाडू येथे एकमेकांविरुद्ध खेळणार आहेत. त्यामुळे त्यांना नमवून विजेतेपद पटकावणे सोपे नाही,’’ असे २६ वर्षीय साईप्रणीतने सांगितले.

२९ एप्रिल, २०१९ ते २६ एप्रिल, २०२० या दरम्यान ऑलिम्पिक पात्रता ठरणार असून ३० एप्रिल, २०२०रोजी जाहीर होणाऱ्या जागतिक बॅडमिंटन क्रमवारीनुसारच २०२०च्या टोक्यो ऑलिम्पिकसाठी कोणते बॅडमिंटनपटू पात्र ठरणार आहेत, हे निश्चित होईल. जागतिक क्रमवारीत २६व्या स्थानी असलेल्या साईप्रणीतला ऑलिम्पिक पात्रता मिळवण्यासाठी अथक परिश्रम व काहीशी नशिबाची साथदेखील आवश्यक आहे.

कोरियाच्या प्रशिक्षकांची निवड!

भारतीय बॅडमिंटन संघटनेने (बीएआय) ऑल इंग्लंड स्पर्धा व ऑलिम्पिकचे महत्त्व लक्षात घेता भारतीय खेळाडूंच्या सराव आणि मार्गदर्शनाकरता कोरियाच्या दोन प्रशिक्षकांची नियुक्ती केली आहे. किम जी ह्य़ुंग व पार्क टे सँग हे दोघे कोरियन प्रशिक्षक पुढील महिन्यात भारतीय चमूशी जुळणार आहेत. ‘‘ह्य़ुंग व सँग हे अनुभवी प्रशिक्षक असून त्यांच्या येण्याने भारतीय खेळाडूंनाच फायदा होणार आहे. विशेषत: खेळाडूंच्या तंदुरुस्तीवर ते अधिक भर देतील, अशी अपेक्षा आहे,’’ असे २०१७च्या सिंगापूर स्पर्धेचा विजेता साईप्रणीतने सांगितले.