विश्वातील अव्वल फुटबॉलपटूंपैकी एक म्हणून नावलौकिक मिळवणाऱ्या ख्रिस्तियानो रोनाल्डोच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला. आंतरराष्ट्रीय कारकीर्दीतील गोलशतक साकारणाऱ्या रोनाल्डोने नोंदवलेल्या दोन गोलांच्या बळावर पोर्तुगालने नेशन्स लीग फुटबॉलच्या ‘क’ गटातील सामन्यात स्वीडनवर २-० असा विजय मिळवला.

३५ वर्षीय रोनाल्डो अशी कामगिरी करणारा फक्त दुसरा खेळाडू ठरला आहे. यापूर्वी इराणचे माजी फुटबॉलपटू अली डेई यांनाच असा पराक्रम जमला आहे. सध्या आंतरराष्ट्रीय फुटबॉल खेळणाऱ्या खेळाडूंपैकी एकही जण रोनाल्डोच्या जवळपास नाही. भारताच्या सुनील छेत्रीने ७२, तर अर्जेटिनाच्या लिओनेल मेसीने ७० आंतरराष्ट्रीय गोल केले आहेत. १६५वा सामना खेळणाऱ्या रोनाल्डोने ४५व्या मिनिटाला तब्बल २५ मीटर अंतरावरून फ्री-कीकद्वारे विक्रमी गोल साकारून त्याच्या नेहमीच्या शैलीत जल्लोष केला. ७२व्या मिनिटाला त्याने आणखी एक गोल नोंदवून पोर्तुगालचा विजय निश्चित केला. पोर्तुगालचा हा या स्पर्धेतील सलग दुसरा विजय ठरला.

अन्य लढतींमध्ये बेल्जियमने आइसलँडचा ५-१ असा धुव्वा उडवला. तर फिफा विश्वचषक विजेत्या फ्रान्सने क्रोएशियावर ४-२ असे पुन्हा वर्चस्व गाजवले. इंग्लंडला मात्र डेन्मार्कने गोलशून्य बरोबरीत रोखले.

आंतरराष्ट्रीय फुटबॉल कारकीर्दीत १०० गोल झळकावण्याचे माझे स्वप्न साकार झाले आहे. परंतु एवढय़ावरच मी थांबणार नाही. भविष्यातही खेळाचा अधिकाधिक आनंद लुटून आणखी विक्रम रचण्याचा प्रयत्न करेन.

– ख्रिस्तियानो रोनाल्डो

९ रोनाल्डोच्या खात्यात आता १०१ आंतरराष्ट्रीय गोल जमा असून अली डेई (१०९ गोल) यांना मागे टाकण्यासाठी त्याला आणखी नऊ गोल झळकावण्याची गरज आहे.

१७ सलग १७व्या वर्षी रोनाल्डोने किमान एक आंतरराष्ट्रीय गोल नोंदवण्याचा अनोखा विक्रम रचला.