सॅक्रॅमेंटो किंग्स आणि इंडियाना पेसर्स यांच्यातील सामन्याच्या ९८ टक्के तिकिटांची विक्री

मुंबई : इंडियन प्रीमियर लीगच्या धर्तीवर जगभरात प्रचंड लोकप्रिय असलेला नॅशनल बास्केटबॉल असोसिएशन अर्थात ‘एनबीए’ ही लीग आता भारतीय चाहत्यांना भुरळ पाडणार आहे. भारतातही प्रचंड चाहतावर्ग असलेल्या ‘एनबीए’मधील सॅक्रॅमेंटो किंग्स आणि इंडियाना पेसर्स या अव्वल संघांमधील दोन प्रदर्शनीय सामने शुक्रवार आणि शनिवारी मुंबईत रंगणार असून त्याला चाहत्यांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे.

अलीकडेच ह्य़ूस्टन येथे झालेल्या ‘हावडी मोदी’ कार्यक्रमात अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेची जागतिक दर्जाची बास्केटबॉल लीग असलेल्या ‘एनबीए’च्या प्रदर्शनीय सामन्यांना हजेरी लावण्यासाठी भारतात येत असल्याचे संकेत दिले होते. त्यानंतर या सामन्यांविषयी कमालीची उत्सुकता निर्माण झाली असून तब्बल ९८ टक्के तिकिटे हातोहात विकली गेली आहेत.

वरळीतील एनएससीआय स्टेडियमवर रंगणाऱ्या या दोन सामन्यांसाठी ४,५०० ते ८५ हजार रुपयांची तिकिटे ठेवण्यात आली आहेत. क्रिकेट सामन्यांपेक्षाही कित्येक पटींनी महाग असलेल्या तिकिटांमुळे या सामन्यांना मुंबईकरांकडून कितपत प्रतिसाद मिळेल, याबाबत साशंकता होती. पण ४५०० प्रेक्षकक्षमता असलेल्या एनएससीआय स्टेडियममधील जवळपास ९८ टक्के तिकिटे विकली गेल्याचे ‘एनबीए’चे उपाध्यक्ष डाएन गोटुआ यांनी सांगितले.

‘‘डोनाल्ड ट्रम्प यांच्या घोषणेनंतर मुंबईतील एनबीएच्या सामन्यांविषयी बऱ्याच प्रमाणात जागरूकता निर्माण झाली. मुंबईत अशाप्रकारचे सामने होत असल्याचे काही लोकांना कळल्यानंतर तिकिटांसाठी अनेकांचे फोन येऊ लागले. पण त्याआधीच स्पर्धेची जवळपास ९० टक्के तिकिटे विकली गेली होती. शुक्रवारी होणाऱ्या पहिल्या सामन्याआधी ९८ टक्के तिकिटे विकली गेली असून चाहत्यांनाही बास्केटबॉल खेळाचा वेगवान थरार अनुभवण्याची संधी मिळेल,’’ असेही त्यांनी सांगितले.