काश्मीरमधील पुलवामा सेक्टरमध्ये १४ फेब्रुवारीला दहशतवादी हल्ला झाला. या हल्ल्यात भारताचे ४० हून जवान मारले गेले. या हल्ल्यानंतर पाकिस्तानला धडा शिकवा अशी मागणी सर्वत्र जोर धरू लागली. तसेच World Cup 2019 मध्ये भारताने पाकिस्तानशी खेळू नये, असाही सूर दिसून आला. यावर पाकिस्तानला पराभूत करून हल्ल्याचा बदल घ्या असे म्हणणाऱ्या मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर याच्यावर भारतीयांनी सडकून टीका केली. पण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी मात्र सचिनची पाठराखण करत टीकाकारांना चांगलेच खडसावले आहे.

१६ जूनला भारत आणि पाकिस्तान यांच्यात World Cup 2019 मध्ये सामना होणार आहे. हा सामना रद्द करून पाकला २ फुकटचे गुण का द्यायचे? असा सवाल सचिनने उपस्थित केला होता. या त्याच्या वक्त्यव्यावर अनेकांनी त्याच्यावर टीका केली होती. पण सचिनला देशभक्ती शिकवू नका, अशा शब्दात ICC आणि BCCI चे माजी अध्यक्ष शरद पवार यांनी या साऱ्यांना सुनावले आहे.

सचिनने कारकिर्दीची सुरुवात शेजारील राष्ट्राला (पाकला) पराभूत करून केली होती, हे टीका करणाऱ्यांनी विसरू नये. तेंडुलकर हा भारतरत्न पुरस्कार प्राप्त खेळाडू आहे तर सुनील गावसकर हे क्रिकेटमधील जाणकार आहेत. पाकिस्तानच्या संघाला भारत नक्कीच पराभूत करेल आणि विश्वचषक पुन्हा एकदा भारतात आणेल अशी या दोघांनाही खात्री आहे. पण सचिनच्या त्या वक्त्यवामुळे तो पाकिस्तानला पाठीशी घालत आहे, अशी टीका केली जात आहे. अशी टीका करणाऱ्यांनी हे अजिबात विसरू नये की १५ वर्षाच्या सचिनने कारकिर्दीची सुरुवात पाकिस्तानला पराभूत करून केली होती, असे ते म्हणाले.