महाराष्ट्र राज्य कबड्डी संघटनेच्या अध्यक्षपदासाठी महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा मार्ग मोकळा झाला असून, आता संपूर्ण कार्यकारिणी समितीवर वर्चस्व निर्माण करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसने मोर्चेबांधणी केली आहे.

राज्य कबड्डी संघटनेच्या २५ नोव्हेंबरला होणाऱ्या निवडणुकीचे शंख फुंकण्यात आले, असून ही निवडणूक बिनविरोध पार पाडण्यासाठी सुकाणू समिती प्रयत्नशील आहे. अध्यक्षपद वगळता १५ पदांसाठी ७० अर्ज दाखल झाले असून, रविवारी अजित पवार यांच्याकडे होणाऱ्या बैठकीनंतर निवडणुकीचे चित्र स्पष्ट होऊ शकेल. मात्र उमेदवार आणि राज्य कबड्डी संघटनेचे भवितव्य ठरवणाऱ्या ७४ पात्र मतदारांमध्ये प्रामुख्याने राष्ट्रवादीचाच भरणा अधिक दिसत आहे.

बाबूराव चांदेरे (रायगड), दादाभाऊ कळमकर (अहमदनगर), किशोर पाटील (धुळे), बबनराव लोकरे (उस्मानाबाद), अमरसिंग पंडित (बीड). राजेश टोपे (जालना), कमलकिशोर कदम (नांदेड), अनिल जाधव (सोलापूर) हे मतदार राष्ट्रवादी आणि अजित पवार यांची आघाडी सांभाळणारे मानले जातात. याशिवाय कोल्हापूर, लातूर, उस्मानाबाद, सातारा, धुळे आणि नाशिक या जिल्हा संघटनांवर राष्ट्रवादीच्याच नेत्यांची सत्ता आहे. आतापर्यंतच्या कबड्डी संघटनेच्या वाटचालीत भाई जगताप (मुंबई), दिनकर पाटील (सांगली) आणि सुरेशराव वरपूडकर (परभणी) या काँग्रेसच्या नेत्यांनी राष्ट्रवादीसोबत युतीचेच धोरण स्वीकारल्याचे दिसून आले आहे. विद्यमान सरकार्यवाह आणि येत्या निवडणुकीत सरकार्यवाह किंवा कार्याध्यक्ष या दोनपैकी एका पदावर हमखास असू शकणाऱ्या शेतकारी कामगार पक्षाच्या अ‍ॅड. आस्वाद पाटील यांनीसुद्धा राष्ट्रवादीच्या पाठबळावरच आपले समीकरण आखले आहे. सध्या भाजपात कार्यरत असलेले औरंगाबादचे दत्ता पाथ्रीकर हे पूर्वाश्रमीचे राष्ट्रवादीचे असल्यामुळे सत्तेत येण्यासाठी त्यांनाही योग्य गणित ठाऊक आहे.

गजानन कीर्तिकर (उपनगर) कार्याध्यक्षपदासाठी दावा करीत असले तरी निवडणूक जिंकण्यासाठी त्यांना फक्त शिवसेनेचे पाठबळ पुरेसे ठरणार नाही. कारण राज्य कबड्डी संघटनेच्या मतदारांमध्ये शिवसेनेच्या सचिन कदम (रत्नागिरी), देवराम भोईर (ठाणे), प्रकाश बोराडे (नाशिक) आणि शशिकांत गाडे (अहमदनगर) यांचा समावेश आहे.

आजच्या बैठकीत महत्त्वाचे निर्णय

निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी सोमवापर्यंतची मुदत देण्यात आली आहे. या पाश्र्वभूमीवर सत्तेचे समीकरण ठरवण्यासाठी रविवारी अजित पवार यांच्यासोबत सुकाणू समितीची बैठक होणार आहे, त्याकडे कबड्डी क्षेत्राचे लक्ष लागून राहिले आहे.

‘औरंगाबाद पॅटर्न’बाबत प्रश्नचिन्ह

मागील निवडणुकीत किशोर पाटील आणि दत्ता पाथ्रीकर यांनी अनुक्रमे अध्यक्ष आणि कार्याध्यक्ष अशी महत्त्वाची पदे मिळवून ‘औरंगाबाद पॅटर्न’ यशस्वी ठरवला होता. यंदाच्या निवडणुकीत गजानन कीर्तिकर आणि प्रताप शिंदे हे मुंबई उपनगरचे उमेदवार अनुक्रमे कार्याध्यक्ष आणि सरकार्यवाह पदासाठी दावा करीत आहेत. याचप्रमाणे रायगडकडून आस्वाद पाटील यांनी कार्याध्यक्ष आणि बाबुराव चांदेरे यांनी सरकार्यवाह पदासाठी अर्ज केला आहे. त्यामुळे ‘औरंगाबाद पॅटर्न’ पुन्हा यशस्वी ठरणार का, याची उत्सुकता निर्माण झाली आहे. परंतु रायगड आणि उपनगरला एकच पद वाटय़ाला येऊ शकेल, असा कबड्डीमधील जाणकारांचा अंदाज आहे.