करोनानंतरच्या क्रीडाविश्वाविषयी खेळाडूंच्या प्रतिक्रिया

नवी दिल्ली : करोना विषाणू संसर्गातून संपूर्ण जग बाहेर पडल्यानंतर क्रीडाविश्व पूर्वीसारखेच असेल की भिन्न असेल, याबाबत खेळाडूंच्या प्रतिक्रिया लक्ष वेधून घेत आहेत. मैदानात गर्दी होईल का?  खेळाडू खेळत असताना सामाजिक अंतर राखतील का? ज्या खेळात खेळाडूंचा एकमेकांशी संपर्क (कुस्ती, बॉक्सिंगसारखे खेळ) येतो, तेथे सामाजिक अंतर कसे राखले जाईल? यांसारखे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत.

सचिन तेंडुलकर, अभिनव बिंद्रा, मेरी कोम, बजरंग पुनिया, विजेंदर सिंग, बायच्युंग भूतिया, कोनेरू हम्पी, डी. हरिका यांसारख्या खेळाडूंनी करोनानंतर क्रीडाविश्व कसे असेल, याबाबत प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत.

जग सध्या कठीण काळाला सामोरे जात आहे, याकडे भारताचा महान क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर याने लक्ष वेधले. ‘‘जगासमोर सध्या खडतर आव्हान उभे ठाकले आहे. क्रिकेटमध्ये चेंडूला लकाकी आणण्यासाठी लाळ लावली जाते. मात्र यापुढे खेळाडू याबाबतीत सतर्क राहतील. काही काळापुरते खेळाडूंचे आलिंगन देण्याचे प्रमाण कमी होईल. सामाजिक अंतर राखण्याचे भान खेळाडू ठेवतील,’’ असे सचिन याने सांगितले.

ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेता नेमबाज अभिनव बिंद्रा म्हणतो की, ‘‘खेळ हा सर्व जगाला एकत्र आणतो. खेळाचा आनंद जगभरात घेण्यात येतो. या स्थितीत करोनानंतरही खेळाविषयीचे आकर्षण कमी होणार नाही. सर्वच जण आता प्रकृतीविषयी सावध झाल्याने व्यायाम आणि खेळाचे महत्त्व वाढणार आहे. करोनामुळे परदेशवारीचे प्रमाण काही महिने कमी होणार आहे. त्याचा फायदा भारतात क्रीडाविषयक चांगल्या पायाभूत सुविधा निर्माण होण्यासाठी होईल.’’

‘‘कुस्ती या खेळात सामाजिक अंतर राखता येत नाही. या स्थितीत या खेळात बदल शक्यच नाही. मात्र कुस्तीपटू दीर्घकाळानंतर एकमेकांविरुद्ध जेव्हा खेळतील तेव्हा त्यांना एकमेकांचे कच्चेदुवे चांगलेच माहिती झाले असतील. सध्या अनेक खेळाडू एकमेकांच्या खेळाचाच अभ्यास करत आहेत. त्यामुळे चुरस अधिक प्रमाणात असेल,’’ असे जागतिक रौप्यपदक विजेता कुस्तीपटू बजरंग पुनियाने म्हटले.

मेरी कोम हिला खेळात अनेक बदल होतील असे वाटत आहे. ‘‘करोनातून कधी बाहेर पडणार हे कोणीच सांगू शकत नाही. मात्र क्रीडाविश्वात बदल होणे अपेक्षित आहे. माझा बॉक्सिंग खेळ सामाजिक अंतर राखणारा नाही. सध्याच्या स्थितीत माझ्या खेळात सरावापासूनही दूर राहणे योग्य ठरेल. सामने म्हटल्यावर प्रेक्षक जमा होणारच. सर्वाच्या आरोग्याचे हित जपण्याचीही जबाबदारी यानिमित्ताने आहे.’’ लस सापडत नाही तोपर्यंत करोनावर मात करणे अवघड आहे, याकडे मेरी कोम हिने लक्ष वेधले. भारताचा ऑलिम्पिक पदकविजेता बॉक्सर विजेंदर सिंग म्हणतो की, ‘‘भारतात गेले अनेक दिवस माणसे त्यांच्या घरात आहेत. जर क्रीडा स्पर्धाना करोनानंतर सुरुवात झाली तर ही मंडळी स्टेडियममध्ये गर्दी करण्याची शक्यता आहे. परदेशात यापुढे सरावासाठी जाणे पुढील काही काळ अशक्य आहे. स्पर्धादेखील कमी संख्येने होतील. त्यामध्ये सहभागदेखील किती असेल याबाबत साशंकता आहे.’’ भारताच्या फुटबॉल संघाचा माजी कर्णधार बायचुंग भूतिया बंदिस्त स्टेडियममध्ये स्पर्धा सुरू करा, असे सांगतो.