नवी दिल्ली : जागतिक क्रमवारीत सुधारणा करण्यासाठी अधिकाधिक आंतरराष्ट्रीय स्पर्धामध्ये खेळण्याकरिता मला निधीची आवश्यकता आहे, असे आवाहन राष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेचा विजेता सौरभ वर्मा याने केले आहे. २६ वर्षीय सौरभने २०११ मध्ये पहिल्यांदा राष्ट्रीय विजेतेपदाला गवसणी घातली होती. त्यानंतर त्याच्या सरावात खंड पडत गेल्यामुळे त्याला सातत्याने आंतरराष्ट्रीय स्पर्धाना मुकावे लागले होते. त्यामुळेच २०१२ मध्ये त्याची ३०व्या क्रमांकावरून आता ५५व्या स्थानी घसरण झाली आहे. ‘‘आंतरराष्ट्रीय स्पर्धामध्ये खेळण्याकरिता माझ्याकडे कोणतेही आर्थिक साहाय्य उपलब्ध नाही. नव्या नियमानुसार, अव्वल २५ खेळाडूंनाच भारतीय बॅडमिंटन महासंघाकडून आर्थिक साहाय्य मिळते. त्यामुळेच माझ्या आंतरराष्ट्रीय स्पर्धामध्ये कपात झाली असून त्याचा फटका क्रमवारीला बसला आहे,’’ असेही सौरभने सांगितले.

‘‘सध्या मी स्वत:च्याच खर्चाने स्पर्धा खेळत आहे. त्यामुळे हॉटेल, प्रवास खर्च तसेच व्हिसा या सर्व गोष्टींची तरतूद करणे माझ्यासाठी जिकिरीचे बनले आहे,’’ असेही सौरभ म्हणाला.