कदम्बी श्रीकांत व सायना नेहवाल यांनी चीन ओपन स्पर्धेत विजेतेपद मिळविले असले, तरी त्यांची परंपरा राखण्यासाठी नवीन खेळाडू तयार करण्याची गरज आहे व त्यासाठी उत्तम दर्जाचे प्रशिक्षकांची आवश्यकता आहे, असे मुख्य राष्ट्रीय प्रशिक्षक पुल्लेला गोपीचंद यांनी येथे सांगितले.
श्रीकांत व सायना यांच्याकडे सातत्यपूर्ण कामगिरी करण्याची क्षमता आहे. मात्र जागतिक स्तरावर सर्वोत्तम यश मिळविण्यासाठी दुसऱ्या फळीतही नैपुण्यवान खेळाडूंची गरज आहे. दुर्दैवाने आपल्या देशात अनुभवी प्रशिक्षकांची कमतरता आहे असे सांगून गोपीचंद म्हणाले, आपल्या देशात या खेळासाठी गुणवान खेळाडूंची कमतरता नाही. मात्र या खेळाडूंकडून सर्वोत्तम कामगिरी करुन घेण्यासाठी योग्य मार्गदर्शन महत्त्वाचे असते.

या खेळासाठी आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सुविधा आपल्याकडे निर्माण झाल्या आहेत. मात्र आंतरराष्ट्रीय स्तरावर विजेतेपद मिळविण्यासाठी खेळावर व सरावावर निष्ठा राखण्याची आवश्यकता आहे. खडतर परिश्रम व एकाग्रता याच्याखेरीज कोणतेही अव्वल यश कठीण असते. जागतिक स्तरावर सर्वोत्तम कामगिरी करण्यासाठी ८ ते १० वर्षे वाट पाहावी लागते, असेही गोपीचंद म्हणाले.