दिवस-रात्र तसेच छोटय़ा शहरांमध्ये सामन्यांचे आयोजन करण्याचे माजी क्रिकेटपटूंचे मत

तुषार वैती, मुंबई पुरुषांप्रमाणेच महिला क्रिकेटची कामगिरी आणि लोकप्रियता दिवसेंदिवस वाढत असून छोटय़ा शहरांमध्ये तसेच प्रकाशझोतात आंतरराष्ट्रीय सामन्यांचे आयोजन करण्यात आल्यास, महिला क्रिकेटला चांगले दिवस येतील, अशी आशा भारताच्या माजी महिला क्रिकेटपटू सुरेखा भंडारे आणि शुभांगी कुलकर्णी यांनी व्यक्त केली आहे.

येत्या २२ फेब्रुवारीपासून भारत विरुद्ध इंग्लंड या महिला संघांमधील एकदिवसीय मालिकेला वानखेडे स्टेडियमवर सुरुवात होत आहे. त्यानिमित्ताने माजी क्रिकेटपटू, प्रशिक्षिका आणि शिवछत्रपती पुरस्कार विजेत्या सुरेखा भंडारे तसेच माजी लेगस्पिनर व अर्जुन पुरस्कार विजेत्या शुभांगी कुलकर्णी यांनी महिला क्रिकेटच्या भरभराटीविषयी आपली मते मांडली.

पुरुषांप्रमाणेच महिलांचेही सामने प्रकाशझोतात खेळवण्याविषयी सुरेखा भंडारे यांनी सांगितले की, ‘‘महिलांचेही सामने आता दिवस-रात्र खेळवण्याची गरज आहे, पण तसे का घडताना दिसत नाही, याची कारणे मला माहीत नाहीत. सामने प्रकाशझोतात खेळवल्यास महिला क्रिकेटपटूंनाही वाव मिळेल, सामन्यांना प्रेक्षकांची गर्दी होईल आणि महिला क्रिकेटचे वेगळे चित्र पाहायला मिळेल. आमच्या वेळी सोयीसुविधा हा शब्दच आम्हाला माहीत नव्हता. १७ वर्षे मी स्वत:च्या खर्चातून तिकिटे काढून सामन्यांसाठी प्रवास करत होते. आता खेळाडूंची उत्तम व्यवस्था राखली जात असून त्यांनी कामगिरी उंचावण्याची गरज आहे.’’

याबाबत शुभांगी कुलकर्णी म्हणाल्या, ‘‘पुरुष आणि महिलांच्या क्रिकेटमध्ये कुठेही भेदभाव होत आहे, असे मला वाटत नाही. उलट सर्वच देशांमध्ये महिला क्रिकेटचे सामने दिवसा खेळवले जातात. क्वचितच प्रकाशझोतात महिलांचे सामने पाहायला मिळतात. प्रमुख महानगरांमध्ये महिलांचे सामने आयोजित करण्यापेक्षा छोटय़ा शहरांमध्ये आंतरराष्ट्रीय सामने खेळवल्यास महिला क्रिकेटची लोकप्रियता अधिक वाढेल. रांची, पाटणा, वापी यांसारख्या शहरांमध्ये सामन्यांना हाऊसफुल्ल गर्दी असते.’’

‘‘स्मृती मानधना, हरमनप्रीत कौर, मिताली राज यांसारख्या काही खेळाडू सातत्याने चांगली कामगिरी करत असल्यामुळे पुरुष क्रिकेटपटूही महिला क्रिकेटचे चाहते बनले आहेत. त्याचबरोबर सामन्यांचे थेट प्रक्षेपण आणि समाजमाध्यमांद्वारे महिला क्रिकेट घरोघरी पोहोचले आहे. दिवसेंदिवस महिला क्रिकेटच्या चाहत्यांमध्येही लक्षणीय वाढ होत आहे,’’ असे कुलकर्णी यांनी सांगितले.

जेमिमा भारताचे नेतृत्व करू शकेल -भंडारे

मुंबईची खेळाडू जेमिमा रॉड्रिग्ज सध्या चांगली कामगिरी करत असून तिच्यात भविष्यात भारताचे नेतृत्व करण्याची क्षमता आहे, असा विश्वास माजी क्रिकेटपटू सुरेखा भंडारे यांनी व्यक्त केला. त्या म्हणाल्या, ‘‘जेमिमा ही भारताचे भवितव्य आहे. तिच्याकडून देशाला चांगल्या कामगिरीची अपेक्षा आहे. एक प्रामाणिक, मेहनती खेळाडू असलेल्या जेमिमाचे पाय अद्यापही जमिनीवर आहेत. यापुढेही तिच्यात बदल होणार नाही, अशी आशा आहे.’’