भारताचे विक्रमवीर व ज्येष्ठ कसोटीपटू सुनील गावसकर यांनी भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी याच्यावर कडाडून टीका केली असून संघाचे नेतृत्व विराट कोहलीकडे देण्यासाठी हीच योग्य वेळ असल्याचे सांगितले.
धोनी याच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने इंग्लंडविरुद्धची कसोटी मालिका १-२ ने गमावली. मालिकेतील भारताच्या निराशाजनक कामगिरीस धोनीचे कचखाऊ नेतृत्व कारणीभूत आहे असे सांगून गावसकर म्हणाले, शेवटच्या कसोटीतील चौथ्या दिवशी धोनीकडेच नेतृत्व रहावे या मताबाबत मी आग्रही होतो, मात्र कोहली याने शतक केल्यानंतर त्याला सूर गवसला असून त्याच्याकडेच नेतृत्व द्यावे असे माझे ठाम मत झाले आहे. कोहली हा संघाची जबाबदारी यशस्वीरीत्या हाताळण्यासाठी समर्थ आहे. सकारात्मक  वृत्तीने तो खेळत असतो आणि भावी काळातील मालिकांचा विचार करता तो सहकाऱ्यांना चांगल्या रितीने इप्सित ध्येय साकारण्यासाठी प्रोत्साहन देऊ शकेल.  
मालिकेतील पराभवास संघातील खेळाडूंची खराब कामगिरी जबाबदार असली तरी त्याबरोबर संघाचे नेतृत्व करणारा धोनी हा देखील तितकाच जबाबदार आहे. त्याच्या नेतृत्वात आक्रमक व सकारात्मक वृत्तीचा अभाव दिसून आला. जर शेवटच्या कसोटीत संघास विजय मिळविणे आवश्यक होते तर धोनी याने तिसऱ्या दिवशीच डाव घोषित करायला पाहिजे होता. इंग्लंडच्या फलंदाजांनी अतिशय आत्मविश्वासाने फलंदाजी केली मात्र आपल्या गोलंदाजांनीही प्रभावहीन गोलंदाजी करीत त्यांना अप्रत्यक्षपणे मदत केली, असेही गावसकर यांनी सांगितले. ते पुढे म्हणाले, धोनी याने फिरकी गोलंदाजी सुरू असताना फॉरवर्ड शॉर्टलेग व सिली पॉइंटला क्षेत्ररक्षक ठेवले नाहीत. जर फलंदाजांजवळ अधिकाधिक क्षेत्ररक्षक ठेवले तर निश्चितपणे त्याच्यावर दडपण येऊ शकते आणि त्याच्याकडून चुका होतात. मात्र धोनी याने अशी व्यूहरचना केली नाही.  
सचिनने कारकिर्दीविषयी गांभीर्याने पाहावे
सचिन तेंडुलकर याने आपल्या कारकिर्दीविषयी निर्णय घेण्याची हीच योग्य वेळ आहे. तो मैदानावर खेळाचा आनंद घेऊ शकत नाही हे स्पष्ट दिसून आले आहे. तुम्ही जर खेळाचा आनंद घेऊ शकत नसाल तर या खेळापासून दूर होण्याची वेळ आता आली आहे, असे सांगून गावसकर यांनी अप्रत्यक्षपणे सचिनला निवृत्त होण्याचा सल्ला दिला.
क्षणचित्रे
*  सचिन तेंडुलकर आज सायंकाळी पत्रकार परिषदेत निवृत्तीची घोषणा करणार अशी दिवसभर अफवा होती. खांद्याला दुखापत झाल्यामुळे तो दिवसभर मैदानावर दिसत नसल्याने या शंकेला बळकटी येत होती. मात्र तसे झाले नाही. सचिनच्या जागी कसोटी पदार्पण करणारा अशोक दिंडा हा मैदानावर आला होता.
*  भारताचे सर्वच गोलंदाज अपयशी ठरल्याने धोनीने सलामीचा फलंदाज गौतम गंभीर यालाही गोलंदाजीसाठी उतरवले होते.
जामठा मैदानावर इंग्लंड संघाच्या पाठिराख्यांची ‘बार्मी आर्मी’ आणि भारतीय क्रिकेटरसिक यांचे घोषणायुद्ध मनोरंजक ठरले होते. इंग्लंड समर्थकांच्या क्रिकेटगीतांच्या प्रत्युत्तरात प्रेक्षकांनी ‘भारतमाता की जय’ आणि ‘वंदेमातरम’चे नारे लावून ‘सारे जहाँ से अच्छा’ हे गीतही गायले.