भारतीय संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनी हा सर्व खेळाडूंसाठी एक प्रेरणास्रोत आहे. अडचणींच्या प्रसंगामध्येही धोनी डोकं शांत ठेवत संयमी खेळी करत आपल्या संघाची नौका किनाऱ्यापार लावतो. आतापर्यंत त्याच्या अनेक खेळी आपण अनुभवल्या असतील. भारताचा सध्याचा आघाडीचा बॅडमिंटनपटू किदम्बी श्रीकांत हा धोनीच्या प्रेमात पडला आहे, भविष्यात आपल्यालाही धोनीसारखा शांत आणि संयमी खेळ करणं जमलं पाहिजे अशी इच्छा श्रीकांतने व्यक्त केली आहे.

“आम्हा प्रत्येक खेळाडूंसाठी धोनी हा एक आदर्श आहे. कठीण परिस्थितीतही धोनी शांत राहून आपला संयम ढळू देत नाही, मला त्याच्यातला हा गुण खूप आवडतो. बॅडमिंटन हा असा खेळ आहे की जिथे तुम्ही केलेली एक चूक तुमच्यासाठी घातक ठरु शकते. अशा परिस्थितीत शांत राहणं गरजेचं असतं, धोनीकडून हा गुण मला आत्मसात करायचा आहे.” राष्ट्रकुल स्पर्धांमध्ये पदक मिळवणाऱ्या बॅडमिंटनपटूंचा बॅडमिंटन असोसिएशनने सत्कार केला, यावेळी श्रीकांत बोलत होता.

यापुढे आशियाई खेळ आणि विश्व अजिंक्यपद स्पर्धेत सर्वोत्तम कामगिरी करण्याचा श्रीकांतचा मानस आहे. काही दिवसांपूर्वी जागतिक क्रमवारीत श्रीकांतने पहिला क्रमांक पटकावला होता. त्यामुळे आगामी काळात कामगिरीत सातत्य राखून हा क्रमांक कायम राखण्याचं आव्हान श्रीकांतसमोर असणार आहे.