भारताविरुद्धच्या मालिकेत दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजांना अजूनही सूर गवसलेला दिसत नाही. दक्षिण आफ्रिकेचा अष्टपैलू खेळाडू जेपी डय़ुमिनीलाही ही सल बोचत आहे. संघातील प्रत्येक फलंदाजाने आत्मपरीक्षण करायला हवे आणि कामगिरीत सुधारणा करायला हवी, असे मत डय़ुमिनीने व्यक्त केले आहे.

‘‘आतापर्यंत आपण कशी कामगिरी केली, हे प्रत्येक फलंदाजाने पडताळून पाहायला हवे आणि कामगिरी कशी सुधारता येऊ शकते, हा प्रश्न स्वत:लाच विचारायला हवा. आमच्याकडून अजून चांगली फलंदाजी अपेक्षित आहे. मला आशा आहे की पुढच्या सामन्यात आमच्याकडून चांगली कामगिरी पाहायला मिळेल,’’ असे डय़ुमिनी म्हणाला.

पहिल्या ट्वेन्टी-२० लढतीत भारताच्या २०४ धावांचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिकेला २८ धावांनी पराभव पत्करावा लागला होता. डय़ुमिनी पुढे म्हणाला की, ‘‘कारकीर्दीमध्ये कधी कधी असा कालखंड येत असतो. पण भारताविरुद्धच्या या दौऱ्यात एकाही अनुभवी खेळाडूला सातत्यपूर्ण कामगिरी करता आलेली नाही, हे आमचे दुर्दैव आहे. चांगले निकाल लागण्यासाठी रणनीतीची अंमलबजावणी होणे फार महत्त्वाचे आहे, पण आमच्याकडून तसे होताना मात्र दिसत नाही. काही गोष्टी आमच्या हातून निसटून जात आहेत. पण यापुढे रणनीतीची योग्य अमंलबजावणी करू अशी मला आशा आहे.’’