राष्ट्रकुल, आशियाई सुवर्णविजेती कुस्तीपटू विनेश फोगटची अपेक्षा

धनंजय रिसोडकर, मुंबई</strong>

कुस्तीसाठी लागणारी प्रतिभा ही प्रामुख्याने ग्रामीण भागातूनच पुढे येत असते. मात्र भारताच्या बहुतांश ग्रामीण भागांमध्ये अद्याप मॅट पोहोचलेल्या नाहीत. त्यामुळे संघटनांच्या माध्यमातून सर्वप्रथम मॅट आणि चांगले प्रशिक्षण उपलब्ध करून देणे आवश्यक असून त्यातूनच भारताला भविष्यातील मल्ल गवसतील, असा विश्वास विनेश फोगटने व्यक्त केला.

नुकत्याच झालेल्या प्रो कुस्तीच्या लीगच्या पाश्र्वभूमीवर अव्वल कुस्तीपटू विनेशने भारतीय कुस्तीची वाटचाल आणि तिच्या भविष्यातील योजनांबाबत म्हटले की, ‘‘कुस्ती लीगसाठी जगभरातून येणाऱ्या अव्वल मल्लांबरोबर राहून सराव करण्याची संधी भारतीय मल्लांना मिळाली. त्यामुळे भारतीय कुस्तीपटूंना खूप मोठे व्यासपीठ उपलब्ध झाले आहे. तसेच यंदा अनेक युवा कुस्तीपटूंना तशी संधी मिळाल्याने त्यांच्या खेळात अधिक सुधारणा होऊ शकणार आहे. हरयाणा हॅमर्सच्या रवीकुमारने त्याचा खेळ प्रचंड उंचावला, तर दिल्ली सुलतानच्या पिंकीने माजी विश्वविजेत्या कुस्तीपटूला चीत करण्याची कामगिरी करून दाखवली. मलादेखील या लीगमधील कुस्तीच्या सरावांचा खूप फायदा झाला आहे. माझ्या खेळात अधिक जास्त चपळाई आली असून त्याचा फायदा मला आंतरराष्ट्रीय स्तरावरील पुढील लढतींसाठी निश्चितपणे होऊ शकेल.’’

‘‘गेल्या दोन-तीन वर्षांपासून क्रीडा मंत्रालयाकडून खेळाडूंना खूप चांगल्या प्रकारे प्रोत्साहन दिले जात आहे. आमच्या प्रशिक्षणासाठी दिल्या जाणाऱ्या सुविधांमध्ये गुणात्मकरीत्या सुधारणा झाली आहे. त्याचा सकारात्मक परिणाम आमच्या खेळांवरही झाला असून भारतीय कुस्तीपटूंच्या गतवर्षीच्या कामगिरीतूनही हेच चित्र अधोरेखित होत आहे. भारतीय कुस्तीपटूंची तयारीदेखील यंदा अत्यंत चांगली आहे. परंतु अद्याप ऑलिम्पिक स्पर्धेला दीड वर्षांचा कालावधी असल्याने कुस्तीत नक्की किती पदके मिळतील, ते सांगणे अवघड आहे. परंतु भारतीय मल्ल अधिकाधिक पदके मिळवण्याचा नक्कीच प्रयत्न करतील,’’ असेही विनेशने नमूद केले.

पुढील आव्हानाबाबत विनेश म्हणाली, ‘‘यंदाच्या वर्षी होणाऱ्या जागतिक स्पर्धेमध्ये विजेतेपद मिळवून ऑलिम्पिकसाठी पात्र होणे, हे माझे प्राथमिक लक्ष्य ठेवले आहे. तसेच त्यानंतर पुढील वर्षी होणाऱ्या टोक्यो ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक मिळवण्याचा मी प्रयत्न करणार आहे. गेल्या वर्षी माझे लग्न झाले असले, तरी माझ्या कारकीर्दीवर त्याचा कोणताही परिणाम होऊ दिलेला नाही. मी लग्नाआधीपासून कुस्तीपटू होते आणि आतादेखील माझी प्राथमिकता माझ्या खेळालाच आहे. त्यात कोणताही बदल झालेला नाही आणि होणारदेखील नाही. लग्नानंतर मी पुन्हा महिनाभराच्या आत सरावाला प्रारंभ केला आहे.’’