ऑस्ट्रेलियासारख्या बलाढय़ संघांविरुद्ध खेळताना दडपणाच्या परिस्थितीत भारतीय हॉकी संघाने सातत्यपूर्ण गोल करण्याची गरज आहे, असे मत नवनियुक्त प्रशिक्षक ग्रॅहम रीड यांनी व्यक्त केले.

आपल्या कार्यकाळात पहिलाच दौरा करणाऱ्या रीड यांनी भारताच्या कामगिरीविषयी मते मांडताना सांगितले की, ‘‘माझ्या मायदेशातच हा दौरा असल्याने भारतीय खेळाडूंचा खेळ अगदी जवळून समजून घेण्याची चांगली संधी मला मिळाली. पाचव्या क्रमांकावरील भारत आणि दुसऱ्या क्रमांकावरील ऑस्ट्रेलिया यांच्यातील खेळाची तुलना मला करता आली. भारतीय संघाने जागतिक दर्जाच्या ऑस्ट्रेलिया संघाविरुद्ध सातत्याने खेळायला हवे, तरच त्यांना कामगिरीत सुधारणा करता येईल.’’

‘‘आता ऑलिम्पिक पात्रता फेरीकडे आगेकूच करताना आम्हाला ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दोन सामन्यांतील अनुभवाचा फायदा होईल. आगामी एफआयएच वर्ल्ड सीरिज फायनल्स स्पर्धेसाठी आमची तयारी उत्तम झाली आहे, असे म्हणता येईल. भारताला आपल्या आक्रमणावर अधिक भर देण्याची गरज आहे. जर दडपणाच्या परिस्थितीत गोल करण्याची क्षमता भारताने विकसित केली तर ऑस्ट्रेलियासारख्या बलाढय़ संघांनाही पराभूत करता येईल. त्यासाठी बचावफळीने गोल करण्याच्या अधिकाधिक संधी निर्माण करण्याची आवश्यकता आहे. आता सोमवारपासून भुवनेश्वर येथे सुरू होणाऱ्या सराव शिबिरात याच गोष्टींवर अधिक भर दिला जाईल,’’ असेही रीड यांनी सांगितले.

‘‘बचावपटूंनी आपल्या क्षेत्रात सुधारणा करण्याची गरज आहे. जगातील अनेक संघ वेगवान आणि ताकदवान हॉकीचे प्रदर्शन करत असताना बचावाच्या बाबतीत सुधारणा केली तर या संघांनाही तोडीस तोड उत्तर देता येईल,’’ असेही ग्रॅहम रीड म्हणाले.