‘लोकसत्ता’च्या वेबसंवादात नेमबाज अंजली भागवत यांचा सल्ला

मुंबई : करोनाकाळातील टाळेबंदीची परिस्थिती अनुभवणारे तुम्ही एकटेच नाही, तर सारे जग या विळख्यात अडकले आहे. जगातील कोणत्याच खेळाडूला मुक्तपणे सराव करता येत नाही. तसे पाहिले तर सर्वच जण एकाच जहाजात आहोत. सर्वसामान्यांपेक्षा वेगळ्या असलेल्या खेळाडूने या काळात सकारात्मकता आणि परिपक्वता जपावी. यशाची सातत्याने कल्पनामय अनुभूती घ्यावी, असा सल्ला आंतरराष्ट्रीय नेमबाज आणि प्रशिक्षक अंजली भागवत यांनी खेळाडूंना दिला.

‘लोकसत्ता’च्या ‘सहज बोलता बोलता’ या शुक्रवारी झालेल्या वेबसंवादात अंजली भागवत यांनी विविध मुद्दय़ांचे परखड विश्लेषण केले. ‘लोकसत्ता’चे वरिष्ठ साहाय्यक संपादक सिद्धार्थ खांडेकर यांनी त्यांच्याशी संवाद साधला. प्रशिक्षक म्हणून घेतलेली जबाबदारी, टोक्यो ऑलिम्पिकमध्ये नेमबाजांना पदके जिंकण्याची संधी, ‘चॅम्पियन ऑफ चॅम्पियन्स’ किताबाच्या आठवणी या विविध विषयांवर अंजली यांनी अतिशय अभ्यासपूर्ण उत्तरे दिली.

‘‘करोना साथीच्या काळातील टाळेबंदी ही सध्या टाळता येण्यासारखी नाही. या परिस्थितीला जगातील प्रत्येकाला सामोरे जायचे आहे. अन्य देशांतील खेळाडूही सराव करू शकत नाहीत. खेळाडू हा नेहमीच सर्वसामान्य माणसापेक्षा प्रगल्भ समजण्यात येतो. या दिवसांमध्ये खेळाडूला तंदुरुस्ती जपायला हवी. मैदाने सरावासाठी सध्या मिळत नसली तरी घरातील उपलब्ध साहित्यांनी सराव करावा. त्याचवेळेस आपण याआधी खेळलेल्या लढती आठवाव्यात किंवा त्या पाहाव्यात. भविष्यात चांगली कामगिरी करणार आहोत, याचे दृश्य डोळ्यांसमोर सतत उभे करावे. सकारात्मक विचार करण्याची खेळाडूंना गरज आहे,’’ असे अंजली यांनी सांगितले.

प्रशिक्षकांचे मोलाचे योगदान!

माझ्या कारकीर्दीत प्रशिक्षकांचे मोलाचे योगदान आहे. कोणत्याही खेळातील खेळाडूला प्रशिक्षक हा गरजेचा असतो. मुंबईत ज्यावेळेस नेमबाजीला सुरुवात केली, त्यावेळी संजय चक्रवर्ती यांनी मला मार्गदर्शन केले. आंतरराष्ट्रीय स्तरावर देशाचे प्रतिनिधित्व करताना भीष्मराज बाम सर मनोधर्य उंचावायचे. बाम यांचे माझ्या आयुष्यात नेहमीच महत्त्वपूर्ण होते. क्रीडा मानसोपचारतज्ज्ञ ही संकल्पना आम्ही खेळताना इतकी प्रगत नव्हती. मात्र त्यावेळी बाम सर मोठय़ा स्पर्धासाठी आम्हाला मानसिकदृष्टय़ा सज्ज करायचे. त्याचा नेहमीच फायदा झाला. हंगेरीचे भारतीय नेमबाजी संघाचे माजी प्रशिक्षक लॅझ्लो शुचॅक यांच्या मार्गदर्शनाचाही कारकीर्दीत भरपूर फायदा झाला. लॅझ्लो यांच्यामुळे भारतात नेमबाजीत अनेक महत्त्वपूर्ण उपक्रम सुरू झाले.

 अपघाताने नेमबाज!

नेमबाजीत सुरुवातीला विशेष आवड नव्हती. मात्र ‘एनसीसी’मध्ये असताना बदली खेळाडू म्हणून अचानक मला आणि दीपाली देशपांडेला नेमबाजी करायला सांगण्यात आले. तेथून खऱ्या अर्थाने नेमबाजीला सुरुवात झाली. मध्यमवर्गीय कुटुंबातील असूनही माझ्या घरच्यांनी मला सदैव पाठबळ दिले. त्यामुळेच आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचू शकले. नेमबाजी करायची नाही, असे ठरवूनही त्यात नाव कमावल्याने ‘अपघाताने नेमबाज’ असे मला म्हटले जाते.

अपयश खेळाचा अविभाज्य भाग!

अपयश हा खेळाचा अविभाज्य भाग आहे, हे प्रत्येक खेळाडूने समजून घ्यावे. खेळाडू म्हणून मन खंबीर असणे महत्त्वाचे आहे. २००४ च्या अथेन्स ऑलिम्पिकपूर्वी मी चारही विश्वचषक स्पर्धामध्ये पदकेजिंकली होती. मात्र तरीदेखील अंतिम फेरी गाठण्यात अपयश आले. त्या ऑलिम्पिकआधी चार वर्षे मी मेहनत घेत होते. घरापासूनही सतत लांब होते. मात्र ऑलिम्पिकमधील तो दिवस माझा नव्हता. मी यशासाठी निश्चित पात्र होते आणि अनुभवीही होते. मात्र पदकापासून दूर राहिले. त्यावेळेस मी रडले होते. मात्र अन्य मातब्बर खेळाडू अपयशाकडे कसे पाहतात आणि स्वत:ला सावरतात हे पाहिले आणि त्यातून बरेच काही शिकले. त्या ऑलिम्पिकनंतर दोन महिन्यांनंतर विश्वचषक स्पर्धा जिंकले.

राज्यांचा क्रीडा क्षेत्रासाठी स्वतंत्र निधी आवश्यक!

सध्याच्या करोनाच्या काळात गरजू उदयोन्मुख किंवा राष्ट्रीय स्तरावरील खेळाडू, मार्गदर्शक किंवा खेळाशी संबंधित कर्मचारी वर्गाच्या मदतीसाठी आर्थिक निधी आवश्यक आहे. गोपीचंद आणि अपर्णा पोपट यांनी नुकताच याप्रकारे पुढाकार घेतला आहे. यासंदर्भात आम्ही राज्य सरकार, केंद्र सरकार आणि क्रीडामंत्र्यांशी चर्चा केली. देशातील प्रत्येक राज्यांचा क्रीडा क्षेत्रासाठी स्वतंत्र निधी असावा, असे आम्ही सुचवले आहे. अव्वल खेळाडूंना एरवीदेखील स्वयंसेवी संस्था, प्रायोजकांकडून मदत मिळते. मात्र जे कनिष्ठ पातळीवरील खेळाडू आहेत, त्यांच्यासाठी जर एक टक्का ‘सीएसआर’ निधी प्रत्येक राज्यांना दिला तर उपयोग होईल.

भारताला पाच ऑलिम्पिक पदके!

नेमबाजीच्या जागतिक क्रमवारीत सध्या भारतीय संघ अग्रस्थानी आहे. भारताच्या संघामधील ८० टक्के नेमबाज हे १८ वर्षांखालील आहेत आणि ते गेली दोन वर्षे सातत्यपूर्ण कामगिरी करत आहेत. या स्थितीत नेमबाजीतून टोक्यो ऑलिम्पिकला किमान पाच पदके मिळतील, याची खात्री आहे. त्यातच यंदाच्या ऑलिम्पिकमध्ये मिश्र सांघिक प्रकार प्रथमच समाविष्ट करण्यात आला आहे. हा प्रकार भारतासाठी फायद्याचा ठरणार आहे. यंदाच्या ऑलिम्पिकसाठी नेमबाजी संघटनेकडूनही भरपूर मेहनत घेण्यात आली आहे. २०१६च्या रियो ऑलिम्पिकमध्ये मोहीम अपयशी ठरली होती. सराव शिबिरांचे योग्य आयोजन न झाल्याने नेमबाजीला फटका बसला.

नेमबाजी महागडा खेळ नाही!

नेमबाजी महागडा खेळ आहे, हा समज चुकीचा आहे. १० मीटरची जागा घरी करूनही सराव करता येतो. एके काळी पाच जण मिळून आम्ही एक रायफल वापरायचो. सध्याच्या काळात मुंबई-पुण्याप्रमाणे कोल्हापूर, नांदेड यासारख्या शहरांमध्ये नेमबाजी खेळ प्रगतिपथावर आहे. नेमबाजी अकादमीमध्ये सुरुवातीला प्रवेश घेतल्यावर तेथील उपलब्ध साधनांनी सराव करण्याची संधीही असतेच.

चॅम्पियन ऑफ चॅम्पियन्सचे ऐतिहासिक यश!

२००२मध्ये लाखमोलाचा ‘चॅम्पियन ऑफ चॅम्पियन्स’ हा प्रतिष्ठेचा सन्मान मिळाला. अजूनपर्यंत भारतात कोणत्याही महिला खेळाडूला हे जेतेपद साधता आलेले नाही. त्या स्पर्धेत पात्र ठरलेली मी भारताची पहिली महिला होते. त्या स्पर्धेच्या अंतिम फेरीत चीनच्या ऑलिम्पिक विजेत्या गाओ जिंग या खेळाडूचे आव्हान होते. मात्र ‘प्रत्येक नेम हा अंतिम असल्याप्रमाणे खेळ’ हा बाम सरांचा सल्ला उपयुक्त ठरला. त्याप्रमाणे खेळले आणि यश मिळवले. त्यानंतर जागतिक क्रमवारीतील अग्रमानांकन मिळाले. ही स्पर्धा झाली, त्यावेळी माझे प्रशिक्षक संजय चक्रवर्ती प्रेक्षकांमध्ये होते.

लोकसंख्या भरपूर, पण खेळाडू कमी!

देशाची लोकसंख्या अब्जावधी असली तरी खेळाडू किती आहेत, हा मुख्य प्रश्न आहे. जर्मनी, अमेरिका यांच्यासारख्या देशांत मैदाने अधिक आणि माणसे तुलनेने कमी असे आहे. मात्र भारतात अजूनही शिक्षणाचे महत्त्व खेळाच्या तुलनेत अधिक आहे. खेळाचे स्वतंत्र विद्यापीठ आजही देशात नाही. या मूलभूत सुविधा जोपर्यंत विकसित होत नाहीत, तोपर्यंत ऑलिम्पिकमध्ये लोकसंख्येच्या तुलनेत पदके जिंकण्याचे स्वप्न बाळगता येणार नाही. सरकारकडूनही विशेष निधी खेळाडूंसाठी स्वतंत्र्यरीत्या राखून ठेवण्याची गरज आहे. खेळाप्रमाणेच शिस्तीचे महत्त्वही तितकेच मोठे आहे. मला ‘एनसीसी’मुळे शिस्त लागली.