टोक्यो ऑलिम्पिक स्पर्धेक भालाफेक प्रशिक्षक असलेल्या उवे हॉन यांना पदावरून हटवण्यात आलं आहे. त्यांची कामगिरी निराशाजनक असल्याचं कारण देत भारतीय अ‍ॅथलेटिक्स महासंघाने त्यांना पदावरून दूर केलं आहे. लवकरच यासाठी दोन प्रशिक्षकांची नियुक्ती करणार असल्याचं भारतीय अ‍ॅथलेटिक्स महासंघाकडून सांगण्यात आलं आहे. जर्मनीच्या उवे हॉन यांचा टोक्यो ऑलिम्पिकपर्यंतच करार होता. २०१७ साली भालाफेकपटू नीरज चोप्राला मार्गदर्शन करण्यासाठी त्यांची नियुक्ती करण्यात आली होती.

“आम्ही दोन नवे प्रशिक्षक नियुक्त करणार आहोत. त्याचबरोबर उवे हॉन यांची कामगिरी चांगली नव्हती. त्याचबरोबर ऑलिम्पिकमध्ये चोप्राला मार्गदर्शन करणारे क्लॉस बार्टोनिट्झ पुढेही कायम राहतील. आम्ही गोलाफेकपटू अ‍ॅथलीट ताजिंदरपाल सिंह तूरसाठीही परदेशी प्रशिक्षक बघत आहोत.”, असं भारतीय अ‍ॅथलेटिक्स महासंघाचे अध्यक्ष आदिल सुमरिवाला यांनी सांगितलं. शिवपाल, अन्नू यांच्यासह थाळीफेकपटू सीमा अँटील आणि गोलाफेकपटू तजिंदर सिंह यांच्या कामगिरीबाबत अध्यक्षांना विचारलं. “हे सांगणं सोपं आहे की शिवपाल आणि अन्नू हे प्रशिक्षक उवे हॉन यांच्यासोबत होते”, असं त्यांनी सांगितलं. फेडरेशनच्या कार्यकारी समितीच्या दोन दिवसांच्या बैठकीनंतर सुमरिवाला पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी भारतीय अॅथलेटिक्स महासंघ नियोजन समितीचे अध्यक्ष ललित भानोत आणि उपाध्यक्ष अंजू बॉबी जॉर्ज उपस्थित होते.

“टोक्यो ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेता नीरज चोप्रा, शिवपाल सिंह आणि अन्नू राणी यांनी हॉन यांच्याकडून प्रशिक्षण घेण्यास इच्छुक नव्हते. डॉ. क्लॉस बायो मॅकेनिकल तज्ञ्ज म्हणून कार्यरत राहतील. आम्ही आणखी दोन प्रशिक्षकांसाठी प्रयत्न करत आहोत.”, असं मुख्य नियोजन आयोग ललित भानोत यांनी सांगितलं. नीरज चोप्रा कॉमनवेल्थ आणि एशियन गेम्स २०१८ या दोन स्पर्धा हॉन यांच्या नेतृत्वाखाली खेळला होता. त्यानंतर जर्मनीच्या क्लॉस बार्टोनिट्झ यांचं मार्गदर्शन टोक्यो ऑलिम्पिक स्पर्धेत नीरज चोप्राला लाभलं होतं.

‘‘मला लीगमध्ये खेळायचं होतं, पण…”, इंग्लंडच्या खेळाडूनं सांगितलं IPLमधून माघार घेण्याचं खरं कारण

दुसरीकडे, हॉन यांनी जून महिन्यात भारतीय क्रीडा प्राधिकरण आणि भारतीय अ‍ॅथलेटिक्स महासंघ यांच्यावर टीका करत यांच्यासोबत काम करणं कठीण असल्याचं म्हटलं होतं. “जेव्हा मी इथे आलो तेव्हा मला वाटलं की मी काही बदल करेन. परंतु या लोकांसाठी कठीण आहे. मला माहिती नाही की, ज्ञानाचा अभाव आहे की, अज्ञान. शिबिरे किंवा स्पर्धेव्यतिरिक्त आम्ही खेळाडूंसाठी पोषक तज्ज्ञांद्वारे पदार्थ मागवतो, तेव्हा आम्हाला ते मिळत नाही. TOPS (टारगेट ऑलिम्पिक पोडियम स्कीम) क्रीडापटूंनाही हे नशीब नाही. जर आपल्याला काही मिळाले तर आपल्याला खूप आनंद होईल.”, असं हॉन यांनी इंडियन एक्स्प्रेशसी बोलताना सांगितलं होतं. दरम्यान दोन्ही संस्थांनी हे आरोप फेटाळून लावले होते.