इंडियन ग्रां. प्रि. अ‍ॅथलेटिक्स

भारताचा अव्वल भालाफेकपटू नीरज चोप्रा याने यंदाच्या मोसमातील सर्वोत्तम कामगिरी करत इंडियन ग्रां. प्रि. अ‍ॅथलेटिक्स स्पर्धेत नव्या विक्रमाची नोंद केली. नीरजने स्वत:चाच विक्रम मोडीत काढत शुक्रवारी ८८.०७ मीटर अशी कामगिरी नोंदवली.

करोनामुळे गेले संपूर्ण वर्ष वाया गेल्याने नीरजने पहिल्याच स्पर्धेत पाचव्या प्रयत्नांत सर्वोत्तम कामगिरी केली. त्याचबरोबर त्याने २०१८ आशियाई क्रीडा स्पर्धेत नोंदवलेला ८८.०६ मीटरचा विक्रम मागे टाकला. उत्तर प्रदेशच्या शिवपाल सिंह याने ८१.६३ मीटरसह रौप्यपदक पटकावले. हरयाणाचा साहिल सिलवाल ८०.६५ मीटर कामगिरीसह तिसरा आला.

२४ वर्षीय चोप्राने पहिल्या प्रयत्नांत ८३.०३ मीटर अशी कामगिरी केल्यानंतर त्याचे दोन प्रयत्न फोल ठरले. चौथ्या प्रयत्नांत त्याने ८३.३६ मीटर अशी कामगिरी केल्यावर पाचव्या वेळी त्याने ८८.०७ मीटर भालाफेक केला. अंतिम प्रयत्नांत मात्र त्याला ८२.२४ मीटर इतकीच कामगिरी करता आली.

यंदाच्या मोसमासाठी मी पूर्णपणे सज्ज झालो आहे. करोनामुळे माझ्या तयारीवर तसेच सरावावर परिणाम झाला असून यापुढे मी सर्वोत्तम कामगिरी करण्याचा प्रयत्न करेन. जागतिक स्तरावर मला यापेक्षाही अधिक चांगली कामगिरी करावी लागेल. आता मी १५ ते १८ मार्चदरम्यान रंगणाऱ्या फेडरेशन चषक राष्ट्रीय अ‍ॅथलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धेत सहभागी होणार आहे.

– नीरज चोप्रा