पोचेफस्ट्रम (दक्षिण आफ्रिका)

भारताचा अव्वल भालाफेकपटू नीरज चोप्रा याने अप्रतिम कामगिरीचे प्रदर्शन करत टोक्यो ऑलिम्पिकमधील आपले स्थान निश्चित केले आहे. नीरजने अ‍ॅकने अ‍ॅथलेटिक्स स्पर्धेत ८७.८६ मीटर भालाफेक करत ऑलिम्पिकसाठी पात्रता सिद्ध केली.

कोपराच्या दुखापतीमुळे नीरज २०१९च्या संपूर्ण मोसमाला मुकला होता. मात्र दुखापतीतून पुनरागमन करत नीरजने पहिल्याच स्पर्धेत ऑलिम्पिकचे तिकीट मिळवले. ऑलिम्पिक पात्रतेसाठीचा ८५ मीटरचा निकष नीरजने चौथ्या प्रयत्नात पार केला. याबरोबरच नीरजने स्पर्धेतही अव्वल स्थान पटकावले. याच स्पर्धेत भारताच्या रोहित यादवने ७७.६१ मीटर अंतरावर भालाफेक करत दुसरे स्थान मिळवले.

तत्पूर्वी, पहिल्या प्रयत्नात नीरजने ८१.७६ मीटर, दुसऱ्या वेळेस ८२ मीटर आणि तिसऱ्या वेळेस ८२.५७ मीटर अंतरावर भालाफेक केली होती. ‘‘पुन्हा स्पर्धात्मक प्रकारात सहभागी झाल्याने आनंद झाला आहे. अर्थातच ऑलिम्पिकसाठी पात्र ठरल्याबद्दल सर्वाचा आभारी आहे. चाहत्यांच्या शुभेच्छांमुळेच हे यश मिळवू शकलो,’’ असे ट्वीट नीरजने केले आहे.

टोक्यो ऑलिम्पिकसाठी पात्र ठरलेला नीरज हा भारताचा चौथा अ‍ॅथलीट ठरला आहे. या काळात त्याला ‘आयएएएफ’ जागतिक स्पर्धा, डायमंड लीग आणि आशिया स्पर्धेला मुकावे लागले आहे. त्याआधी जकार्ता एशियाडमध्ये राष्ट्रीय विक्रमाची नोंद करत नीरजने सुवर्णपदक पटकावले होते.