रांची येथे आजपासून राष्ट्रीय अजिंक्यपद अ‍ॅथलेटिक्स स्पर्धेला सुरुवात

रांची : नुकत्याच झालेल्या जागतिक स्पर्धेतील अपयश मागे सारून गुरुवारपासून सुरू होणाऱ्या राष्ट्रीय अ‍ॅथलेटिक्स स्पर्धेत दमदार कामगिरी करण्याचे भारतीय खेळाडूंचे ध्येय आहे. विशेषत: दुखापतीतून सावरत पुनरागमन करण्यासाठी सज्ज असलेल्या भालाफेकपटू नीरज चोप्राच्या कामगिरीवर चाहत्यांचे खास लक्ष आहे.

२१ वर्षीय नीरज गतवर्षी सप्टेंबरमध्ये अखेरची स्पर्धा खेळला होता. परंतु त्यानंतर गुडघ्याच्या दुखापतीमुळे त्याला वर्षभरातील सर्व स्पर्धाना मुकावे लागले. २०१८च्या राष्ट्रकुल आणि आशियाई सुवर्णपदक विजेत्या नीरजने सव्‍‌र्हिसेस अ‍ॅथलेटिक्स स्पर्धेत शेवटचा सहभाग नोंदवला होता. त्यामुळे आता टोक्यो ऑलिम्पिकला अवघे १० महिने शिल्लक असताना नीरज त्याची तंदुरुस्ती सिद्ध करण्यासाठी उत्सुक असेल. १३ ऑक्टोबपर्यंत रंगणाऱ्या या स्पर्धेत भारतातील ३६ अ‍ॅथलिट्स सहभागी होणार आहेत.

नीरजव्यतिरिक्त धावपटू मोहम्मद अनास, द्युती चंद, स्टीपलचेसपटू जिन्सन जॉन्सन, महिला भालाफेकपटू अन्नू राणी आणि गोळाफेकपटू तेजिंदरपाल सिंग तूर यांच्या कामगिरीवरही क्रीडाप्रेमींच्या नजरा आहेत.

जवळपास वर्षभर स्पर्धात्मक वातावरणापासून दूर राहिल्यामुळे राष्ट्रीय स्पर्धेत छाप पाडण्यासाठी मी उत्सुक आहे. यंदाच्या वर्षांतील अखेरची स्पर्धा असल्यामुळे ऑलिम्पिकपूर्वी स्वत:ची तंदुरुस्ती सिद्ध करण्यासाठी माझ्याकडे सुवर्णसंधी आहे. डॉक्टरांच्या सल्ल्यानंतरच मी या स्पर्धेत सहभागी होण्याचा निर्णय घेतला आहे.

– नीरज चोप्रा, भारताचा भालाफेकपटू