नीरज चोप्रा (भालाफेक), नयना जेम्स (लांब उडी) व नवनीत कौर धिल्लाँ (थाळीफेक) यांनी आगामी राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेसाठी आपला सहभाग निश्चित केला. या स्पर्धेसाठी भारतीय अ‍ॅथलेटिक्स महासंघाने निश्चित केलेले पात्रता निकष त्यांनी पार केले आहेत.

पुनरागमन करणाऱ्या चोप्राने पतियाळा येथे झालेल्या भारतीय ग्रां. प्रि. मैदानी स्पर्धेतील भालाफेकीत ८२.८८ मीटपर्यंत अंतर पार केले व राष्ट्रकुलची पात्रता पूर्ण केली. या स्पर्धेत विपिन कासनाने रौप्यपदक मिळवले, तर अमित कुमारला कांस्यपदकावर समाधान मानावे लागले.

२० वर्षीय नीरज हा जर्मनीत वेर्नर डॅनियल्स यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करतो. गोळाफेकीत तेजिंदरपाल सिंगने सुवर्णपदक जिंकले; परंतु त्याने नोंदवलेली १९.९५ मीटरची कामगिरी

राष्ट्रकुल पात्रता पूर्ण करण्यासाठी अपुरी होती. नवीन चिक्कारा व परमजित सिंग यांना अनुक्रमे रौप्य व कांस्यपदक मिळाले.

आशियाई इनडोअर स्पर्धेतील लांब उडीत रौप्यपदक मिळवणाऱ्या नयनाने ग्रां. प्रि. स्पर्धेत ६.४७ मीटपर्यंत उडी मारली व सुवर्णपदक जिंकले. निना पिंटो व पूर्णिमा

हेम्बराम यांनी अनुक्रमे रौप्य व कांस्यपदकाची कमाई केली. जागतिक कनिष्ठ स्पर्धेतील कांस्यपदक विजेती नवनीतने थाळीफेकीत ५९ मीटर पात्रता निकष पार केला. परबाती सेठी आणि प्रभज्योत राय यांनी अनुक्रमे रौप्य व कांस्यपदक जिंकले.

महाराष्ट्राच्या कालिदासला सुवर्ण

महाराष्ट्राच्या कालिदास हिरवेने पुरुषांच्या ३००० मीटर शर्यतीत सुवर्णपदकाची कमाई केली. त्याने हे अंतर ८ मिनिटे २६.५४ सेकंदांत पूर्ण केले. उत्तर प्रदेशचा अर्जुन कुमार (८:२६.५८ से.) आणि गुजरातचा अजित कुमार (८:३५.४६ से.) यांना अनुक्रमे रौप्य व कांस्यपदकावर समाधान मानावे लागले.