पीटीआय, नवी दिल्ली

टोक्यो ऑलिम्पिकमधील भारताचे आशास्थान असलेला भारताचा भालाफेकपटू नीरज चोप्रा आंतरराष्ट्रीय प्रवास र्निबधांमुळे फिनलँड कुओर्टेन क्रीडा या सराव स्पर्धेला मुकणार आहे. फिनलँड सरकारने भारतीय प्रवाशांना आपल्या देशात येण्यास बंदी घातली आहे.

कुओर्टेन अ‍ॅथलेटिक्स क्रीडा स्पर्धा २६ जून रोजी रंगणार आहे. ‘‘नीरज चोप्रा २२ जून रोजी स्वीडन येथे रंगणाऱ्या कार्लस्टॅड ग्रां. प्रि. स्पर्धेत सहभागी होणार आहे. मात्र कुओर्टेन स्पर्धेसाठी नीरजला फिनलँड सरकारकडून अद्याप परवानगी मिळालेली नाही. त्यामुळे त्याचा सहभाग अनिश्चित मानला जात आहे,’’ असे सूत्रांनी सांगितले.

नीरजला गेल्या आठवडय़ात फ्रान्सला जाण्यासाठी व्हिसा मंजूर झाला आहे. ‘‘परदेशात सराव करण्यासाठी नीरजला फ्रान्समधील लिएव्हिन येथे १० दिवसांच्या विलगीकरणात राहावे लागणार आहे. मात्र यादरम्यान त्याला दिवसातून दोन तास सराव करण्याची मुभा मिळावी, अशी विनंती करण्यात आली आहे. विलगीकरणाचा कालावधी संपल्यानंतर बदलत्या परिस्थितीमुळे नीरज किती स्पर्धामध्ये सहभागी होईल, हे आताच सांगता येणार नाही,’’ असेही या सूत्रांनी सांगितले. २

नीरजने मार्च महिन्यात पतियाळा येथील स्पर्धेत ८८.०७ मीटर भालाफेक करत राष्ट्रीय विक्रम नोंदवला होता. जानेवारी २०२०मध्ये पोचेफस्ट्रम येथील स्पर्धेत त्याने ८७.८६ मीटर इतकी कामगिरी नोंदवली होती. त्याने टोक्यो ऑलिम्पिकसाठीचा ८५ मीटरचा पात्रता निकष याच स्पर्धेत पार केला होता.