ग्रँडमास्टर परिमार्जन नेगीने बशेर आयती याच्याविरुद्ध बरोबरी पत्करली तरी अन्य भारतीय बुद्धिबळपटूंनी केलेल्या शानदार कामगिरीमुळे भारताने ४१व्या बुद्धिबळ ऑलिम्पियाडमध्ये सीरियावर ३.५-०.५ असा विजय साकारला.
पहिल्याच सामन्यात नेगीवर पराभवाचे सावट होते. पण बशेरने विजयासाठी सोप्या चाली चालताना चूका केल्या, त्यामुळे नेगीला बरोबरी साधण्याची संधी मिळाली. ४४ चालींनंतर दोघांनीही बरोबरी पत्करण्याचे मान्य केले. पी. सेतूरामनने पांढऱ्या मोहऱ्यांसह खेळताना हसन ओमरानीचा पराभव केला. बी. अधिबानसमोर अख्रास खालेदचा निभाव लागला नाही. एम. आर. ललितबाबूने वार्द अल-ताबरेशवर सहज विजय साकारत भारताला ही लढत जिंकून दिली.
महिलांच्या ऑलिम्पियाडमध्ये, तानिया सचदेवच्या नेतृत्वाखालील खेळणाऱ्या भारताने न्यूझीलंडचा ४-० असा धुव्वा उडवला. द्रोणावल्ली हरिकाने पहिल्या लढतीतून माघार घेतल्यामुळे अव्वल पटावर खेळणाऱ्या तानियाने हेलेन मिलिगेन हिला पराभूत केले. त्यानंतर ईशा करवडेने मरानी मेयेर हिला हरवले. मेरी अ‍ॅन गोम्सने जुडी गाओ हिचा तर पद्मिनी राऊतने निकोल सोई हिचा पराभव केला. भारतीय पुरुषांची पुढील लढत कॅनडाशी तर महिलांचा सामना डेन्मार्कशी होणार आहे.