रणजी स्पर्धेच्या अंतिम फेरीत २१ वर्षांनी स्थान मिळविणाऱ्या महाराष्ट्राच्या खेळाडूंना यंदाच्या आयपीएल क्रिकेट स्पर्धेत चांगला भाव मिळेल अशी अपेक्षा होती मात्र महाराष्ट्राच्या खेळाडूंची उपेक्षाच झाली आहे.
केदार जाधव व विजय झोल या दोनच खेळाडूंना यंदाच्या आयपीएलमध्ये स्थान मिळाले आहे. यंदाच्या स्थानिक स्पर्धामध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या केदारला दोन कोटी रुपयांचे मानधनावर दिल्ली डेअरडेव्हिल्सने आपल्याकडेच राखले आहे. १९ वर्षांखालील गटाच्या आशिया चषक स्पर्धेत भारतास विजेतेपद मिळवून देणारा कर्णधार विजय झोल याला रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघाने तीस लाख रुपयांची बोली लावत विकत घेतले आहे. या दोन खेळाडूंचा अपवाद वगळता महाराष्ट्र संघातील अन्य गुणवान खेळाडूंना यंदाच्या आयपीएलची दारे खुली झाली नाहीत.
अंकित बावणे याने यंदाच्या मोसमात सातत्याने खेळ करीत सहाशेपेक्षा जास्त धावा केल्या आहेत. त्याला किमान १० लाखांचे बोलीवरही कोणी घेतले नाही. हर्षद खडीवाले याने यंदाच्या मोसमात ५९ धावांचे सरासरीने एक हजारहून अधिक धावा केल्या आहेत. त्याने यंदा एक द्विशतक व एक शतक टोलविले होते. बावणे व खडीवाले हे बदली गोलंदाज म्हणूनही अनेक वेळा यशस्वी ठरले आहेत.
समाद फल्लाह या वेगवान गोलंदाजाने यंदाच्या मोसमात ३७ बळी घेतले आहेत. एकाच सामन्यात दहा किंवा त्याहून अधिक बळी घेण्याची कामगिरीही केली आहे. द्रुतगती गोलंदाज श्रीकांत मुंढे यानेही यंदा प्रभावी गोलंदाजी करीत ३४ बळी घेतले आहेत. अनुपम संकलेचा यानेही यंदा एकोणतीस विकेट्स घेतल्या आहेत.अक्षय दरेकर या फिरकी गोलंदाजाने यंदा तीस गडी बाद केले आहेत. एका सामन्यात दहा बळी घेण्याची किमयाही त्याने केली आहे.
महाराष्ट्राने रणजी स्पर्धेच्या उपान्त्यपूर्व फेरीत मुंबईला मुंबईतच पराभूत करीत सनसनाटी विजय नोंदविला होता. पहिल्या डावात पिछाडीवर असताना व विजयाचे पारडे मुंबईच्या बाजूने झुकले असताना महाराष्ट्राने हा सामना जिंकला होता. उपान्त्य फेरीत त्यांनी बंगालवरही अनपेक्षित मात केली होती. एवढी चांगली कामगिरी होऊनही महाराष्ट्राच्या केवळ दोनच खेळाडूंना आयपीएलमध्ये स्थान मिळाले आहे.
रणजी विजेत्या कर्नाटक संघाचा कर्णधार आर.विनयकुमार, रॉबिन उथप्पा, लोकेश राहुल, मनीष पांडे, करुण नायर, चिदंबरम गौतम, मयांक अगरवाल यांना आयपीएलमध्ये संधी मिळाली आहे.