भारताच्या सायना नेहवालने ऑस्ट्रेलियन बॅडमिंटन सुपरसीरिजमध्ये अंतिम फेरीत धडक मारीत यंदाच्या वर्षांतील दुसरे विजेतेपद मिळविण्याच्या आशा उंचावल्या आहेत. तिने जागतिक क्रमवारीतील द्वितीय मानांकित खेळाडू शिक्सियन वाँगवर २१-१९, १६-२१, २१-१५ असा सनसनाटी विजय मिळविला.
या स्पर्धेत सायनाला सहावे मानांकन देण्यात आले आहे, तर वाँगला अग्रमानांकन मिळाले होते. विजेतेपदासाठी सायनाला स्पेनच्या कॅरोलिन मेरिन हिच्या आव्हानाला सामोरे जावे लागणार आहे. कॅरोलिनने जपानच्या युई हाशिमोतो हिच्यावर २१-१७, २१-१६ असा सरळ दोन गेम्समध्ये विजय मिळविला.
जागतिक क्रमवारीतील द्वितीय मानांकित वाँगला तीन गेम्सच्या लढतीनंतर पराभूत केल्यामुळे मला खूप आनंद झाला आहे. तिच्याविरुद्ध माझा हा पाचवा विजय आहे. विजेतेपद मिळविण्यासाठी माझा आत्मविश्वास उंचावला आहे असे सायना हिने आपल्या ट्विटरवर म्हटले आहे.
सायनाला या अगोदरच्या दोन लढतींमध्ये वाँगने नमवले होते. अगदी अलीकडे सायनास ऑल इंग्लंड स्पर्धेत वाँगविरुद्ध हार पत्करावी लागली होती. पहिल्या गेममध्ये १९-१९ अशी बरोबरी होती. सायनाने सलग दोन गुण घेत ही गेम घेतली. दुसऱ्या गेममध्ये वाँगने चिवट खेळ केला. दोन्ही खेळाडूंनी झुंजार खेळ केला. त्यामुळे १६-१६ अशी बरोबरी होती. तेथून वाँगने वेगवान खेळ करीत सायनाच्या परतीच्या फटक्यांना चोख उत्तर देत सलग पाच गुण मिळवित ही गेम घेतली.  या बरोबरीमुळे तिसऱ्या गेमबाबत कमालीची उत्सुकता निर्माण झाली. ही गेमही रंगतदार झाली.
सायनाने स्मॅशिंगच्या जोरकस फटक्यांचा कल्पकतेने उपयोग केला आणि हा गेम घेत सामनाही जिंकला. सायनाने यंदा नवी दिल्ली येथे झालेल्या भारतीय ग्रां. प्रि. स्पर्धेत विजेतेपद मिळविले होते.