नेपाळ क्रिकेट संघाला गुरुवारी एकदिवसीय क्रिकेटचा दर्जा मिळाला. विश्वचषक पात्रता क्रिकेट स्पध्रेच्या प्ले-ऑफमध्ये नेपाळने पपुआ न्यू गिनी संघाला सहा विकेट राखून हरवले. दीपेंद्र सिंग ऐरीच्या अष्टपैलू खेळाने नेपाळच्या विजयात सिंहाचा वाटा उचलला.

संदीप लॅमिचाने आणि दीपेंद्र यांनी प्रत्येकी चार बळी घेत पपुआ न्यू गिनीचा डाव २४.२ षटकांत ११४ धावांत गुंडाळला. या पराभवामुळे गिनीने आपला एकदिवसीय क्रिकेटचा दर्जा गमावला आहे. त्यानंतर नेपाळने चार फलंदाजांच्या मोबदल्यात २३ षटकांत विजयी लक्ष्य पार केले. दीपेंद्रने ५८ चेंडूंत एक चौकार आणि तीन षटकारासह नाबाद ५० धावा काढल्या.

अफगाणिस्तानचा विंडीजवर धक्कादायक विजय

मुजिबूर रेहमानचा फिरकी मारा आणि रेहमत शाहच्या आक्रमक फलंदाजीच्या बळावर अफगाणिस्ताने विश्वचषक पात्रता क्रिकेट स्पध्रेतील अव्वल सहा संघांच्या दुसऱ्या फेरीत बलाढय़ वेस्ट इंडिजवर तीन विकेट राखून विजय मिळवला. वेस्ट इंडिजने प्रथम फलंदाजी करताना ८ बाद १९७ धावा केल्या. त्यानंतर अफगाणिस्तानने ४७.४ षटकांत सात फलंदाजांच्या मोबदल्यात विजयी लक्ष्य पेलले. शाहने १०९ चेंडूंत पाच चौकार आणि एका षटकारासह ६८ धावा काढल्या.