सध्याचा काळ हा वेब सिरीजचा काळ आहे. छोट्यांपासून ते मोठ्यांपर्यंत सारेच वेब सीरिजचे प्रेमी आहेत. त्यामुळे हल्ली चित्रपटगृहांपेक्षा वेब सिरीजचा प्रेक्षक वर्ग अधिक दिसून येतो. क्रिकेटवर आधारित अनेक वेब सिरीजदेखील लोकप्रिय ठरल्या. ‘इनसाइड एज’, ‘सिलेक्शन डे’ या वेब सिरीज चांगल्याच गाजल्या. यात भर म्हणून आता IPL आणि मुंबई इंडियन्स यांचावर एक वेब सिरीज ‘नेटफ्लिक्स’वर येत आहे. IPL मध्ये मुंबईचा संघ एक यशस्वी संघ आहे. या संघावर नेटफ्लिक्स एक वेब सिरीज बनवणार आहे. नेटफ्लिक्सने मंगळवारी याबाबतची घोषणा केली.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, नेटफ्लिक्सच्या वेब सीरिजमध्ये ‘Cricket Fever: Mumbai Indians’ या नावाने मुंबई इंडियन्सवर डॉक्युमेंटरी/ वेब सिरीज तयार केली जात असून १ मार्चला त्याचा पहिला भाग प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. यात मुंबई इंडियन्सचा IPL मधील प्रवास दाखवण्यात येणार आहे. या आठ भागांमध्ये मुंबई इंडियन्सच्या (२०१३, २०१५ व २०१७) या तीन विजेतेपदांचा प्रवास विशेष पद्धतीने दाखवण्यात येईल. याबरोबरच मैदानाबाहेर घडलेल्या घटनांबाबतही या ८ भागात दाखवण्यात येणार आहे. त्यामुळे ही वेब सिरीज मुंबई इंडियन्सच्या चाहत्यांची उत्सुकता वाढवत आहे.