* धक्कादायक पराभवामुळे मुख्य फेरीचे दरवाजे बंद
*   क्रोएशिया, टर्कीचे शानदार विजय
बलाढय़ नेदरलँड्सची युरो फुटबॉल चषक स्पध्रेत कर्तृत्व गाजवण्याची संधी हुकली आहे. पात्रता फेरीच्या सामन्यांमध्ये सर्वसाधारण कामगिरी झाल्याने नेदरलँड्सला गाशा गुंडाळावा लागला आहे.गणितीय समीकरणांनुसार नेदरलँड्सला मुख्य फेरी गाठण्यासाठी चेक प्रजासत्ताकला नमवणे आवश्यक होते. आणि त्यानंतर आइसलँडने टर्कीवर मात केल्यास नेदरलँड्सला मुख्य फेरीचा मार्ग सुकर होणार होता. मात्र चेक प्रजासत्ताकने नेदरलँड्सला नमवले तर टर्कीने आइसलँडवर १-० अशी मात केल्याने नेदरलँड्सला मुख्य फेरीचे दरवाजे बंद झाले.

चेक प्रजासत्ताकतर्फे पॅव्हेल कडराबेकने २४व्या मिनिटाला गोल केला. १० मिनिटांनी जोसेफ सुरलने आणखी एक गोल करत चेक प्रजासत्ताकला आघाडी मिळवून दिली. ६६व्या मिनिटाला नेदरलँड्सच्या रॉबिन व्हॅन पर्सीने स्वयंगोल केला. चारच मिनिटात लास जॅन हंटेलेआरने नेदरलँड्सचे खाते उघडले. स्वयंगोलची परतफेड करत व्हॅन पर्सीने ८३व्या मिनिटाला गोल केला. बरोबरी करण्यासाठी नेदरलँड्सने आटोकाट प्रयत्न केले. मात्र चेकच्या शिस्तबद्ध बचावापुढे ते अपुरे ठरले.
नेदरलँड्सने गेल्या वर्षी झालेल्या विश्वचषकात तिसरे स्थान मिळवले होते. १९८८ मध्ये युरोपियन अजिंक्यपद स्पर्धेचे जेतेपद त्यांनी पटकावले होते. २००२नंतर फुटबॉल विश्वातल्या सर्व प्रमुख स्पर्धामध्ये खेळण्याचा मान नेदरलँड्सने पटकावला होता. मात्र चेक प्रजासत्ताकविरुद्धच्या पराभवामुळे त्यांना युरो चषकात खेळता येणार नाही.

अन्य लढतीत सेल्युक इनानने ८९व्या मिनिटाला केलेल्या निर्णायक गोलच्या बळावर टर्कीने आइसलँडवर विजय मिळवला. या विजयासह टर्कीचा संघ मुख्य फेरीसाठी पात्र ठरला आहे. आतापर्यंत २० संघांनी मुख्य फेरीत धडक मारली असून, आणखी चार संघांना पात्र ठरण्याची संधी आहे.
युरो चषकासाठी आतापर्यंत पात्र ठरलेले संघ
फ्रान्स, चेक प्रजासत्ताक, आइसलँड, टर्की, बेल्जियम, वेल्स, स्पेन, स्लोव्हाकिया, जर्मनी, पोलंड, इंग्लंड, स्वित्र्झलड, उत्तर आर्यलड, रोमानिया, ऑस्ट्रिया, रशिया, इटली, क्रोएशिया, पोर्तुगाल, अल्बानिया.